चंद्रपूरच्या औषध व्यावसायिकाला २१पर्यंत पोलिस कोठडी

विवाह समारंभातून शहरातील प्रतिष्ठीत कोळसा व्यापाऱ्याच्या अवघ्या आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी औषध व्यावसायिक अनिरुध्द चकण्यारपवार (३८) याला जिल्हा पोलिस दलाने अटक केली आहे. चकण्यारपवारने यापूर्वीही दोन अल्पवयीन मुलींवर असेच अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली असून आरोपीविरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली.

चंद्रपूर-नागपूर मार्गावर हॉटेल ट्रायस्टारच्या मागे रामकिशनचंद्र पबनानी यांचे ‘राधाकृष्ण सेलिब्रेशन हॉल व लॉन’ आहे. नुकतेच या लॉनचे उद्घाटन झाले असून, गुरुवारी रात्री येथे एक विवाह समारंभ होता. यासाठी शहरातील एक प्रतिष्ठीत कोळसा व्यापारी सहकुटूंब आले होते. मात्र, या विवाह समारंभातून कोळसा व्यापाऱ्याची आठ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिचे अपहरण झाले म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मुलीचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही, हे बघून कुटुंबीयांनी दीड-दोन तासांनी दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही अपहरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून शोध सुरू केला. सुमारे तीन तासांनी मुलगी अतिशय वाईट अवस्थेत पडोली चौकात एका ट्रकचालकाला सापडली. त्याने आठ वर्षांची मुलगी रात्री अंधारात एकटी उभी राहून रडत असल्याचे बघून विचारपूस केली. यावेळी मुलीला तिच्या वडिलांचा भ्रमणध्वनी लक्षात असल्याने तिने लगेच ट्रकचालकाला नंबर सांगितला. यानंतर ट्रकचालकाने वडिलांना दूरध्वनीवरून मुलीची माहिती दिली. तात्काळ कुटुंबीय पडोलीला पोहोचले आणि मुलीला ताब्यात घेतले. यावेळी मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती, त्यामुळे ती प्रथमत: काहीच बोलली नाही.

मुलीच्या अंगावरील कपडे पूर्णत: फाटलेले होते, त्यामुळे तिच्यावर अत्याचार झाला असावा, असा संशय आल्याने आईवडीलांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला, तसेच अत्याचार पांढऱ्या रंगाच्या गाडीत झाल्याचेही तिने सांगितले. यावेळी पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून एका रात्रीत ४०० आय २० व २५० मारुती स्विफ्ट गाडय़ांची तपासणी केली. त्यानंतर त्यातील पांढऱ्या रंगाच्या आय २० गाडीचा शोध घेतला. रात्रभर पाठपुरावा केल्यावर मध्यरात्री उशिरा येथील जनता कॉलेज चौकातील औषध व्यावसायिक अनिरुध्द चकण्यारपवारला पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला आरोपीने बनवाबनवी केली. मात्र, पोलिसी हिसका बसताच आणि काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याला बोलते केल्यावर त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याने यापूर्वी १० जुलैला अशाच पध्दतीने ओम भवनातून एका मुलीला स्वत:च्या गाडीत चॉकलेट देऊन बसविण्याचा प्रयत्न केला होता, तर मार्चमध्येही एका मुलीवर अशाच प्रकारे अतिप्रसंग केल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्यात तेव्हा तक्रार झाली होती. आरोपीची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. आरोपीविरुध्द आठ वर्षांंपूर्वी घरफोडीचाही गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, बालकाचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, याच दृष्टीने ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली. आरोपीने यापूर्वी आणखी किती मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, याचाही पोलिस शोध घेत आहे.

चाकू, तलवार जप्त

आरोपी अनिरुध्द चकण्यारपवारला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर त्याची २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या जनता महाविद्यालय चौकातील औषध दुकानाची तपासणी केल्यावर तेथे चाकू व तलवार सापडली. ही दोन्ही शस्त्रे जप्त करून पोलिसांनी दुकानाला सील ठोकले आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत आहे काय, अशी विचारणा पोलिस अधीक्षकांना केली असता, दबावाचा प्रश्नच नाही, हा गुन्हा अतिशय गंभीर असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.