18 March 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा जात पंचायतीचा प्रयत्न

कुटुंबियांना बहिष्कृत करण्याची धमकी

(प्रतिकात्मक छायाचित्र )

कुटुंबियांना बहिष्कृत करण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी देण्याचा प्रकार तालुक्यातील राजेवाडी येथे घडला. या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यावर बुधवारी त्र्यंबक पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेवाडी येथे १४ वर्षांची मुलगी पालकांसमवेत राहते. परिसरात राहणारा संशयित दिनकर येले (१९) याने या मुलीवर २३ जानेवारी रोजी घरात शिरून अत्याचार केला. या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर गावात जात पंचायतीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत पंचांनी पीडित मुलीबरोबर संशयिताने लग्न करावे अथवा लग्न न केल्यास मुलीला नुकसान भरपाई म्हणून संशयिताच्या वडिलांच्या नावावर असलेली पाच एकर जमीन द्यावी, असा निर्णय दिला. दोन्ही कुटुंबियांनी या निर्णयास संमती देत १०० रुपयांच्या मुद्रांकावर पंचांसमोर ‘आप समजूत करारनामा’ करण्यात आला.

दरम्यान, संशयित दिनकरने लग्नास नकार दिला. कागदपत्र फाडून टाकत जमीनही देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताच्या कुटूंबाने पंचायतीच्या माध्यमातून पीडितेच्या कुटुंबाला  बहिष्कृत करण्याची धमकी दिली. सर्व बाजूने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असतांना श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणले. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या अब्रूची किंमत पाच एकर जमीन

पीडित मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण दाबले जावे, यासाठी जात पंचायतीप्रमाणेच दोन्ही कुटूंबे जबाबदार आहेत. त्या मुलीला लग्न कोणाशी करायचा हा निर्णय न घेऊ देता तिच्या अब्रूची किंमत पाच एकर जमीन ठरविण्यात आली. ही जमीन संशयिताने देण्याचे नाकारल्याने हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा जात पंचायतीमुळे हे प्रकरण दाबले गेले असते.   – भगवान मधे (श्रमजीवी संघटना)

First Published on March 8, 2018 1:07 am

Web Title: minor girl raped in nashik