राहाता : येथील एका शाळेत अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग केल्याच्या घटनेला चार दिवस झालेत. अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी या प्रकाराची साधी चौकशीही न केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.

राहाता पंचायत समिती व शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षित वृत्तीमुळे तालुक्यातील अनेक शाळांतील विद्याथ्यार्ंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी घटना घडल्यानंतर  या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट देऊन मुलींच्या तसेच विद्याथ्यार्ंच्या सुरक्षेबाबत दक्षता घेणे गरजेचे होते. मात्र पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी या घटनेकडे  दुर्लक्ष केल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. नामांकित शाळेत बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुलीला चाकू दाखवत तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रकार घडला. कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने या तरुणाने भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला अन्यथा अनुचित घटना घडली असती. पीडित मुलीच्या आई वडिलांनी शाळेतील शिक्षकांना या घटनेची माहिती दिली असता शिक्षकांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह पोलीस ठाण्यात येऊन या प्रकारास वाचा फोडली. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी शाळेला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली व परिसराची पहाणी केली.