पंढरपूर : तालुक्यातील एका अल्पवयीन मतिमंद,गतिमंद आणि अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नारायण भानुदास कदम याला तिहेरी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी सुनावली आहे.

पंढरपूर तालुक्यात ३० सप्टेंबर २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर नारायण भानुदास कदम या ५८ वर्षीय इसमाने दुष्कर्म केले होते. त्या पीडित मुलीच्या आजीने ते पाहिले होते. त्यावरून याबाबत करकंब पोलीस ठाण्यात नारायण कदम यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्या वेळी तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला होत. विशेष म्हणजे घडल्या घटनेनंतर २४ तासांतच आरोपीस गजाआड करण्यास पोलीस यशस्वी झाले होते.  सदरच्या घटनेतील पीडित ही दलित समाजाची होती. त्यामुळे या प्रकरणी अनेक संघटना आक्रमक होऊन आरोपीस कठोर शिक्षेच्या मागणी केली होती.

या बाबत येथील न्यायालयात सुनावणी करण्यात आली. एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी,वैद्यकीय अधिकारी आणि तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची साक्ष न्यायालयात ग्रा धरली. यावरून न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी आरोपी नारायण भानुदास कदम याला भादवि ३७६ करिता त्याच्या उर्वरित नैसर्गिक जीवनाच्या अन्तोपावेतो आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड तसेच अनुसूचित जातीजमाति कायद्यानुसार आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि ५ हजार दंड आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार आजन्म कारावास तथा जन्मठेप आणि पाच हजार दंड आणि इतर कायद्यानुसार पाच वर्षे कारावास आणि १ हजार दंड अशी एकंदर तिहेरी जन्मठेप आणि १६ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून सहायक पोलीस फौजदार संजय मंगेडकर यांनी काम पाहिले.