लग्न सराईत चोरांनी मंगल कार्यालयात धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे घडलेल्या चार घटनांवरुन समोर येत आहे. शहरातील डॉ. जयंत तुपकरींच्या मुलीच्या प्री वेडींग समारंभातून अल्पवयीन बालकांनी अवघ्या दोन मिनिटात ४२ तोळ्यांचे दागिने आणि सव्वा लाखाची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दोन्ही मुलं लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यावरुन त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सलग चौथी घटना घडल्याने या मुलांनी एकाप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

गारखेडा परिसरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी (५५, रा. सारंग हाऊसिंग सोसायटी, गजानन महाराज मंदिराजवळ) यांची मुलगी डॉक्टर कल्याणी हिचा २६ डिसेंबर रोजी विवाह होता. त्याचा स्वागत समारंभ तुपकरी कुटुंबियांनी २५ डिसेंबर रोजी गुरु लॉन्समध्ये आयोजित केला होता. यासाठी तुपकरी कुटुंबीयांचे अनेक निकटवर्तीय तसेच शहरातील दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यात दुचाकीवर आलेले दोन अल्पवयीन मुलं शिरली. तुपकरी यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती रात्री अकराच्या सुमारास स्टेजवरुन खाली उतरत असताना एकाने त्यांच्या पर्सला हात लावण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर डॉक्टर ज्योती कुटुंबीयांसोबत रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी जेवणासाठी टेबलावर बसल्या. त्यावेळी त्यांनी हातातील दागिने, मोबाइल आणि रोख असलेली पर्स खुर्चीवर ठेवली. याची संधी साधत मुलाने अवघ्या दोन मिनिटात पर्स लांबवत त्याच्या साथीदाराला इशारा केला. यानंतर हा मुलगा लॉन्स बाहेर जाऊन दुचाकीने साथीदारासह पसार झाला. हा सर्व प्रकार लॉन्समधील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.

पर्स लंपास झाल्याचे समजताच डॉक्टर ज्योतींनी हा प्रकार पती जयंत यांना सांगितला. नेमके याचवेळी समारंभाला हजेरी लावण्यासाठी आलेले सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांना कळविण्यात आला. त्यांनी घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर लॉन्समधील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात दोन अल्पवयीन बालकांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टर ज्योती यांच्या पर्समध्ये ८० ग्रॅमचे राणीहार व कर्णफुले, प्रत्येकी शंभर ग्रॅमचे मनीहार, कानातले, दोन मोठे मंगळसूत्र, प्रत्येकी ६० ग्रॅमच्या चार लहान, एक मोठी अंगठी, एक नेकलेस व कानातले पांढरे खडे आणि वीस ग्रॅमचे खड्याचे पेंडेंट, मंगळसूत्र असे ४२ तोळ्यांचे दागिने, चांदीची भेट वस्तू, प्रत्येकी २०१ रुपये असलेले ९८ गिफ्ट पाकिट तसेच ५० हजारांची रोकड असा ऐवज होता.

सलग चौथी घटना…..
– नाशिकातील ३० वर्षीय महिला भाचा गणेश भांबरे याच्या विवाहासाठी हडकोतील सौभाग्य मंगल कार्यालयात आली असताना सात ते आठ वर्षाच्या मुलाने सोन्याचे टाप्स, वेल असे पाच ग्रॅमचे दागिने आणि रोख चार हजार रुपये असलेली पर्स लांबवली.

– दुसरी घटना सिडको, एन-८ भागातील सप्तपदी मंगल कार्यालयात घडली. रफीऊद्दीन मयोद्दीन खाटीक (३८, रा. मल्हारपुरा, चोपडा, जि. जळगाव) हे व-हाडी मंडळींना लक्झरीने घेऊन सप्तपदी मंगल कार्यालयात आले होते. दुपारी दिडच्या सुमारास कार्यालयात अष्टगंधाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या पँटच्या खिशातील चार हजारांची रोकड लांबवली.

– बीड बायपासवरील रिगल लॉन्सवर कैलास गंगाराम चाटसे (५०, रा. व्दारकापुरी, एकनाथनगर) यांच्या मुलीचे २३ डिसेंबर रोजी लग्न होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू असताना चोरांनी रोख एक लाख ३४ हजार सातशे रुपये आणि सहा ग्रॅमची सोनसाखळी लंपास केली.