मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. सद्य:स्थितीत शहरात दीड टक्के रुग्ण उपचार घेत असल्यामुळे करोना मुक्तीच्या दिशेने पालिकेची वाटचाल सुरू आहे.
शहरातील नागरिकांना नवकरोना आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी पालिका यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परदेशांतून आलेल्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार ७९५ इतकी आहे. तर आतापर्यंत ७९० रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे.
टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर मीरा-भाईंदर शहरात रुग्णसंख्या वाढीचा आलेख झपाटय़ाने वर जाताना आढळून आला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या २४ हजार ५६६ इतकी झाली असून हे प्रमाण ९५.२४ टक्के झाले आहे. तर सध्या करोनाबाधित रुग्ण ४३९ असून हे प्रमाण १.७० टक्के आणि करोनाबळी रुग्ण ७९० झाले असून हे प्रमाण ३.०६ टक्के एवढे आहे.
सहा हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण
मीरा-भाईंदर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या सुमारे ६ हजार २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता मागील शुक्रवारी लसीकरणाची रंगीत तालीमदेखील सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाच्या सरावाकरिता तीन शासकीय आणि सहा खासगी रुग्णालये अशा एकूण ९ ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लसीकरण मोहीमप्रमुख डॉ. अंजली पाटील यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:06 am