कर्मचाऱ्यांचा बस आगाराबाहेर रात्रभर ठिय्या; वेतन मिळाल्याशिवाय बस सुरू न करण्याचा इशारा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील समस्या अद्याप कायम आहे. शुक्रवारपासून  बससेवा सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु कर्मचाऱ्यांना वेतन उपलब्ध  न झाल्याने त्यांनी बसआगाराबाहेर ठिय्या आंदोलन दिले. त्याच वेळी पगाराविना एकही बस मार्गावर धावू देणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. दरम्यान, शनिवारपासून (ता.२६) परिवहनच्या बसगाडय़ा नियमित धावू लागतील, अशी माहिती पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.

करोनाकाळात परिवहन सेवा ठप्प ठेवल्यामुळे प्रशासन आणि कंत्रादारमध्ये वाद सुरू आहेत.

परिवहनच्या कर्मचाऱ्यांना गेले सहा महिने पगार न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठेका रद्द करून परिवहन सेवा  स्वत:कडे घेण्यासाठी प्रशासनाकडून कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे बसगाडय़ा चालविण्यासाठी कंत्राटदाराला परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.

कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन न दिल्याने त्यांनी विरोध दर्शवला आहे.

पालिकेने सूचविलेल्या दहा मार्गावर बसगाडय़ा सुरू करण्याचे तसेच २८ सप्टेंबरपासून महापालिकेने सूचवलेल्या अन्य  मार्गावर पालिका देईल त्या वेळापत्रकानुसार बसगाडय़ा नियमित सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पगार मिळेपर्यंत आगाराबाहेर एकही बसगाडी काढू न देण्याचा इशारा  कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.