दिगंबर शिंदे, सांगली

निम्मा जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. टँकर कधी येतो याच्या विवंचनेत जनता डोळे लावून तर आभाळातील राजा कधी एकदा बरसतो याच्या चिंतेत बळीराजा असताना जिल्हय़ातील राजकीय सत्तेचा दुष्काळ मात्र अखेरच्या टप्प्यात संपला. मिरजेचे आमदार आणि तासगावचे भूमिपुत्र सुरेश खाडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. औट घटकेचे मंत्रिपद का असेना आता त्यांच्या मनीषा पूर्ण झाल्या.

भाजपने गेल्या चार वर्षांत आयारामांच्या जिवावर का असेना बहुसंख्य सत्तास्थाने काबीज करीत जिल्हय़ाच्या राजकीय क्षितिजावर एक अढळ स्थान निर्माण केले. एकेकाळी केवळ निवडणूक लढवायची एवढाच हेतू असलेला भाजप आता जिल्हय़ाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला. एक खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद, महापालिका आणि काही पंचायत समित्या आणि नगर पंचायती ताब्यात आल्याने सत्तेची फळे कार्यकर्त्यांच्या वाटय़ाला आली आहेत.

मात्र गेली चार वर्षे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सांगलीला संधी मिळणार असे चंद्रकांत पाटील हे आवर्जून सांगत होते. आता मंत्रिपदी विराजमान झालेले सुरेश खाडे यांना संधी दिली जाणार असे सांगितले जात होते. मंत्रिपदाकरिता त्यांना तब्बल पावणे पाच वर्षे वाट पाहावी लागली.

महायुतीच्या हाती सत्ता आली त्यावेळी २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी खाडे यांची विजयी मिरवणूक काढली तीच मुळी जिल्हय़ाचे भावी पालकमंत्री असा फलक लावूनच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कमळ फुलविणारे खाडे पहिल्या टप्प्यातच मंत्री होणार हे गृहीतच धरण्यात आले होते. भाजपला भरभरून मते देणाऱ्या सांगलीला मंत्रिपदाचा दुष्काळ गेली चार वर्षे सतावत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सत्तेशी जवळीक साधलेल्या सदाभाऊ खोत यांना आमदारकीबरोबरच राज्यमंत्रिपद मिळाले. मात्र भाजपचे निष्ठावान आज नाही उद्या तर सत्तेचा दुष्काळ हटेल या विवंचनेत होते. मात्र शिराळ्याचे शिवाजीराव नाईक हे अभ्यासू, मंत्रिपदावर हक्क सांगणारे मातब्बर असताना खाडे यांनी मात्र बाजी मारली हे मान्यच करावे लागेल.

भाजपमध्ये खाडे यांना मंत्रिपद मिळाल्याचा अपेक्षित आनंद मात्र जिल्हय़ात फारसा दिसलाच नाही. एरवी देशात भाजपची सत्ता आली की मिरजेत फटाक्यांची आताषबाजी केली जात होती. मात्र यावेळी खाडे यांच्या कार्यालयासमोर चार माळा पेटल्या. यामुळे निदान मिरजेला मंत्रिपदाची संधी मिळाली याची माहिती तरी सामान्य मतदारांना झाली. अन्यथा तेही कोणाच्या गावी आले नसते.

विकासकामांसाठी मोठा निधी

खाडे तसे मूळचे तासगाव तालुक्यातील पेडचे. खासदार संजय पाटील यांच्या तालुक्यातील. मात्र त्यांचे कार्यक्षेत्र प्रारंभी जत राहिले. मिरज मतदारसंघ आरक्षित होताच २००९ मध्ये त्यांनी जतला वगळून मिरज मतदारसंघ जवळ केला. काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेला नेतृत्वाचा दुष्काळ हेरून त्यांनी भाजपची पेरणी करीत असताना कधी काँग्रेसची कधी राष्ट्रवादीशी जवळीक करीत आपले मताधिक्य वाढवीत नेले. वेळोवेळी विकास कामांना पाठपुरावा करून त्यांनी मतदारसंघासाठी निधीही मोठय़ा प्रमाणात आणला. गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघामध्ये १६०० कोटींचा निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर कडेगावचे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनाही निदान ११ महिन्यांसाठी विधान परिषदेवर संधी दिली असून यामागे खासदारांच्या वर्चस्वाला लगाम घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे.