गेली ८९ वष्रे सुरू असलेला मिरजेतील ज्ञानयज्ञ १ मे पासून सुरू होत असून, यंदाच्या ज्ञानयज्ञात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, विनय सहस्रबुद्धे आदी व्याख्यात्यांच्या वक्तृत्वाचा लाभ श्रोत्यांना लाभणार आहे.
मिरज विद्यार्थी संघाची वसंत व्याख्यानमाला १ मे पासून सुरू होत आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. याच दिवशी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ते गुंफतील. ‘जागतिकीकरणातील श्रमिक’ असा त्यांचा विषय आहे. दुस-या दिवशी दीपक करंजीकर यांचे ‘विश्वपटलावर भारत’ याविषयी व्याख्यान होणार आहे. ३ मे रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘राजकारणाचे अर्थकारण’ या विषयावर व्याख्यान होईल. ४ मे रोजी ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर हे ‘भारतसेवक गोपाळकृष्ण गोखले’ याविषयी पुष्प गुंफतील. गोखले यांच्या निर्वाण शताब्दीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केले आहे. ५ मे रोजी पुण्यातील प्रा. सुजाता सोमण आणि त्यांचा सहकारी ‘पुत्र अमृताचा, स्वामी विवेकानंद’ या विषयावर चरित्रगायन करणार आहेत. ६ मे रोजी ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे हे ‘उडत्या तबकडय़ा, एक लोकभ्रम’ याविषयी माहिती देतील.
पुण्यातील ८७व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. िशदे यांचे ७ मे रोजी ‘विनोद, एक दृष्टिकोन’ याविषयी व्याख्यान होईल. विनोद हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय असून तो सोपा करण्याची किमया ते करतील. ८ मे रोजी सांगलीतील गुरुवर्य कोटणीस महाराजांचे ‘समर्थ शिष्य- कल्याण’ याविषयी व्याख्यान होईल. ९ मे रोजी डॉ. विनय सहस्रबुद्धे (मुंबई) हे ‘समर्थ लोकशाहीसाठी राजकीय सुधारणा’ याविषयीचे पुष्प गुंफतील. १० मे रोजी डॉ. अनिल मडके (सांगली) यांचे ‘नवीन जीवनशैलीचे विकार’ याविषयी व्याख्यान होणार आहे. ११ मे रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव हे ‘जादूटोणाविषयी कायदा’ याविषयी बोलतील. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ चमत्कारांची प्रात्यक्षिकेही ते दाखवणार आहेत.
१२ मे रोजी अंजली कीर्तने, मुंबई यांचे ‘दुर्गा भागवत, एक शोध’ या विषयावर व्याख्यान आणि लघुपट सादर होणार आहे. १३ मे रोजी सांगता होणार आहे. ज्येष्ठ कलाकार विसूभाऊ बापट हे त्याचे मानकरी आहेत. त्यांचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम ते सादर करणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अ‍ॅड. चिमण लोकूर यांनी दिली. या वेळी संस्थेचे सभासद मकरंद देशपांडे, सुधीर नाईक, विष्णू तुळपुळे आदी उपस्थित होते. मुक्तांगण सभागृहाच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी पावणेसात वाजता व्याख्याने सुरू होतील.