News Flash

मिरजेत यादवकालीन शिलालेख आढळला

इ.स. १२२२ मध्ये यादव सम्राट सिंघण दुसरा यांच्या कालखंडातील हा शिलालेख आहे.

बेडग येथे आढळलेला शिलालेख

सांगली जिल्ह्य़ाच्या इतिहासावर नवा प्रकाश

सांगली जिह्य़ाचे चालुक्यकालीन संदर्भ स्पष्ट होत असतानाच तेराव्या शतकातील देवगिरीच्या यादव साम्राज्यातील दानाचा उल्लेख असलेला शिलालेख मिरज तालुक्यातील बेडगच्या महादेव मंदिरात आढळून आला आहे. इ.स. १२२२ मध्ये यादव सम्राट सिंघण दुसरा यांच्या कालखंडातील हा शिलालेख आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी जिल्ह्य़ाच्या विविध भागात असलेले ऐतिहासिक संदर्भ शोधण्याची मोहीम सध्या हाती घेतली आहे. या अंतर्गत बेडग येथे घोरपडे सरकारांच्या राजवाड्यालगत असलेल्या महादेव मंदिरामध्ये शिलालेख असल्याची माहिती मिळाली.  मात्र या शिलालेखाचे वाचन होत नसल्याने आतापर्यत हा अंधारात होता.

या शिलालेखाचे वाचन झाल्याने जिल्हयाच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवी सन १२२२ मधील हा शिलालेख  हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.

बेडग येथे महादेव मंदिरात शिलालेख आढळून आला. हा लेख भिंतीमध्ये लावण्यात आला आहे. तीन फूट उंचीचा शिलालेख दोन टप्प्यात असून, सध्या त्याच्या २८ ओळी वाचता येतात. शिलालेखाच्या वरील भागात मध्यभागी शिविलग असून, त्याच्या एका बाजूला सूर्य-चंद्र, नंदी आणि दुसऱ्या बाजूला गाय कोरली आहे. एक भक्त शिविलगाची पूजा करतानाही दाखविला आहे.

या लेखात प्रारंभी देवगिरीचा यादव सम्राट दुसरा सिंघण याचा गौरव करणाऱ्या ओळी आहेत. माळवा, गुर्जर या देशातील राजांचा पराभव करणारा, होयसळ आणि तेलगू देशात वादळ माजविणारा प्रताप चक्रवर्ती सिंघण राजा देवगिरी येथे काव्य विनोदात सुखेनवपणे राज्य करीत असताना हा दानलेख दिले असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हा दानलेख शके ११४४ चित्रभानू संवत्सर, काíतक शुद्ध प्रतिपदा यादिवशी म्हणजेच इसवी सन १२२२  साली दिला आहे. या लेखात सिंघण देवाचा सेनापती विक्रमदेव याचा उल्लेख आला आहे.

या लेखानुसार मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी मंदिरासाठी दान दिले आहे. यामध्ये त्या वेळी प्रसिद्ध असणाऱ्या ‘वीरवणंज’ या व्यापाऱ्यांच्या संघटनेचाही उल्लेख यामध्ये आला आहे. या संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक व्यापाऱ्यांची नावे या लेखात दिली आहेत. यामध्ये मेटी सेट्टी, नानी सेट्टी, कुमार सेट्टी आणि या सगळयांचा प्रमुख असणारा सोमय्य यांसह अन्य व्यापाऱ्यांची नावे आहेत. यादव राजाचा सेनापती विक्रमदेव याच्या वतीने मल्लय नामक व्यक्तीमार्फत हा दान लेख दिल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 12:56 am

Web Title: miraj yadava period inscription was found
Next Stories
1 पुणे विभागात सोलापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक चारा छावण्या
2 ‘अरे लाजा कशा वाटत नाही’, नवाब मलिक भाजपावर संतापले
3 ‘ईडी’ दणका, नागपूरमध्ये ४८३ कोटींचा मॉल जप्त
Just Now!
X