हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे शनिवारी पहाटे गलेफ अर्पण केल्यानंतर प्रारंभ झाला. यंदा होत असलेला उरूस ६३९वा असून परंपरेप्रमाणे दर्गा पटांगणावर उभारणी करण्यात आली. गुलबर्गा येथील सूफी संत अफसर बाबा व मुस्तफाबाबा यांच्या हस्ते विधी होत आहे.
चर्मकार समाजातर्फे मानाचा गलेफ अर्पण केल्यानंतर महापालिकेच्या वतीने मीरासाहेब दग्र्याला गलेफ चढविण्यात आला. उद्या रविवारी सरकारतर्फे गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. उरुसानिमित्त दर्गा इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहर पोलीस ठाणे ते स्टँड चौकापर्यंत सुमारे दीड किलोमीटर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत.
या उरुसाच्या पार्श्र्वभूमीवर रविवारपासून तीन दिवस चालणाऱ्या अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेची सुरुवात होणार असून, दर्गा परिसरातील ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली खाँसाहेबांचे शिष्यगण संगीतसेवा सादर करणार आहेत.