धान्य वितरित झाले नसतानाही संकेतस्थळावर नोंद; लोकायुक्तांकडे तक्रार

जून ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पालघर जिल्ह्यासह राज्यातील सर्व भागांमध्ये असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये तूरडाळ, साखर, रॉकेल, उडीदडाळ, चणाडाळ असे पदार्थ प्रत्यक्ष दुकानदारांना वितरणासाठी दिलेले नसताना त्याची ऑनलाइन विक्री झाल्याचे दर्शवण्यात येत आहे. यामुळे राज्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार पालघरमधील स्वस्त धान्य दुकानदाराने लोकायुक्तांकडे केली आहे.

२०१८मध्ये ई- पॉज यंत्राद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्यांचे मूल्यांकन आणि पावती निर्माण केली जात असे. या यंत्राचे ऑनलाइन सॉफ्टवेअर एकत्रितपणे राज्यस्तरावर केले जात असल्याचे पाहण्यात आले होते. जून ते डिसेंबर २०१८च्या दरम्यान तूरडाळ, केरोसीन, उडीदडाळ, चणाडाळ, साखर यांपैकी काहीही शिधावाटप दुकानांमध्ये दिले गेले नसतानाही त्यांची प्रत्यक्ष विक्री केली गेल्याचे सर्वसामान्य ग्राहकांना देण्यात आलेल्या देयकावरून दिसून येते. असे असताना पालघर तालुक्यासह अनेक ठिकाणी या वस्तूंचा दुकानदारांनाही पुरवठा करण्यात आला नसल्याने खोटय़ा नोंदी दाखवून या गृहोपयोगी वस्तूंची परस्पर बोगस विक्री झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पालघर येथील एका नागरिकाने ऑगस्ट २०१८मध्ये ‘महाफूड’ या शासनाच्या संकेस्थळावरून माहिती काढली असता पालघर तालुक्यात १८ हजार किलो तूरडाळ आणि साडेनऊ  हजार किलो साखर, पालघर जिल्ह्यात ७८ हजार किलो तूरडाळ आणि ७१ हजार किलो साखर तर संपूर्ण राज्यामध्ये याच महिन्यात २,३१,००१ क्विंटल तूरडाळ आणि १८,००० क्विंटल साखरेची बोगस विक्री झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध स्तरांवर तक्रारी केल्यानंतर त्याची दखल न घेतली गेल्याने लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात दुकानदाराने संबंधित वस्तूंचे चलन न भरता तसेच त्याकरिता कोषागारामध्ये (ट्रेजरी) पैसे जमा न करता, वास्तूचे परमिट न देता या वस्तूंचे वितरण झाल्यादे दर्शविण्यात आले असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.