देश-विदेशातील उद्योजकांना विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेचा पहिला दिवस पोलिसांची कडेकोट सुरक्षा आणि ढिसाळ व्यवस्थेमुळे चांगलाच गाजला. प्रचंड गाजावाजा झालेल्या परिषदेच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका व्हीआयपी आणि मीडियाला बसला. उद्घाटनाच्या वेळी राजकीय पक्षांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि हौसे-नवसे कार्यक्रमस्थळी शिरल्याने डेलिगेट्सना बाहेर थांबण्याचे प्रसंग उद्भवले. अनेक व्हीआयपी आणि बडय़ा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सभागृहात बसायला जागा नसल्यामुळे उभे राहून कार्यक्रम बघावा लागला.
रामदास पेठमधील हॉटेल सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, मारुती सुझुकी लिमिटेडचे अध्यक्ष आर.सी.भार्गव, जेएसडब्ल्यू स्टील्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल, रेमंडस्चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम सिंघानिया, भेलचे मुख्य व्यवस्थापक संचालक डी. प्रसाद यांच्यासह विविध देश-विदेशांतील बडे उद्योजक उपस्थित असल्यामुळे हॉटेल परिसरात पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पहिल्या माळ्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभागृहात कोणालाही ओळखपत्राशिवाय प्रवेश नसल्यामुळे प्रसारमाध्यमांसह अनेक मान्यवरांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. सभागृहात ३५० ते ४०० लोकांची आसनव्यवस्था करण्यात असताना वाट्टेल तसे ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी, त्यांचे कर्मचारी, आजी-माजी मंत्री, आमदार, हौसे-नवसे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि उद्योजकांनी आधीच जागा आरक्षित केल्यामुळे वेळेवर आलेल्या अनेक मान्यवरांना सभागृहात बसायला जागा मिळाली नाही. सभागृहात जागा नसल्यामुळे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे शेजारच्या सभागृहात केवळ भाषणे ऐकण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन अनेकांनी कार्यक्रम ऐकला. परिषदेच्या निमित्ताने वाटप करण्यात आलेल्या ओळखपत्राशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी सभागृहात जाण्यासाठी या ना त्या मार्गाने ओळख दाखवून प्रवेश केला. त्यात काही ‘सोफस्टिकेटेड’ अनेकांनी मंत्र्यांची ‘पहुँच’ सांगून तर काहींनी उद्योजकांचे नाव सांगून प्रवेश मिळविला. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांशी अनेकांची बाचाबाची झाली.
रामदास पेठसारख्या वर्दळीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या परिसरात पार्किंगसाठी कुठलीच अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे परिषदेला आलेल्या प्रतिनिधींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडय़ा लावून ठेवल्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक खोळंबली होती. चारचाकी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे अनेक दुचाकी वाहने लावण्यासाठी जागा नसल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली होती. मंत्र्यांच्या गाडय़ांची पार्किं गव्यवस्था हॉटेलच्या तळमजल्यात करण्यात आली होती, त्यामुळे उद्घाटनाचा सोहळा आटोपल्यावर त्यांची वाहने बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. रामदास पेठ परिसरात मोठय़ा प्रमाणात खाजगी रुग्णालयांची संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात, त्यात काही गंभीर रुग्ण असतात. त्यामुळे हॉटेल परिसरातील कडक सुरक्षा व्यवस्थेचा फटका अनेक रुग्णालयांना आणि रुग्णांना बसला.