बिबटय़ाचे वारंवार दर्शन घडणाऱ्या आणि जंगलाने वेढलेल्या ढेबेवाडी खोऱ्यातील वरचे घोटील (ता. पाटण) येथून काल बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराजवळ खेळताना अचानक बेपत्ता झालेला आर्यन जीवन पवार हा दोन वर्षांचा चिमुरडा आज सकाळी घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जंगल परिसरात वडिलांच्या हाकेला प्रतिसाद देत प्रकटला. कालचा दिवस व पूर्ण रात्र जंगलात घालवणा-या आर्यनच्या पायाला काटे टोचले आहेत. मात्र, जंगली श्वापदांनी त्यास कोणतीही इजा पोहोचवलेली नाही. हा एकंदर प्रकार ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच म्हणावा लागेल.
आई-वडिलांसह मुंबईत वास्तव्यास असलेला आर्यन यात्रेनिमित्त वरचे घोटील या मूळ गावी आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील मुंबईला गेले. परंतु आर्यन व त्यांची आई गावीच थांबून कसणी या गावी आर्यनच्या मावशीकडे जाऊन कालच सकाळी घोटीलला परतले होते. यानंतर घरामागील बाजूस आर्यन खेळत होता. यावर आर्यनला घरी जाण्यासाठी त्याच्या चुलत्यांनी बजावले. आणि ते कामासाठी निघून गेले. दरम्यान, आर्यनच्या आईच्या लक्षात आले, की आर्यन दिसून येत नाही. यावर तिने तो शोधूनही सापडत नसल्याने आर्यन बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला. आणि त्याच्या बेपत्ता होण्याने अनेक तर्कवितर्काना उधाण आले. बिबटय़ा अथवा जंगली श्वापदाने आर्यनला इजा पोचवली असले काय, की त्याचे कोणी अपहरण केले असेल अशी उलटसुलट चर्चा राहिली. यावर आर्यनच्या शोधार्थ त्याचे नातेवाईक, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनीही कंबर कसली. पाटणचे विभागीय पोलीस अधिकारी दीपक उंबरे यांनी आर्यनच्या गायब होण्याचा प्रकार गांभीर्याने घेऊन सर्व त्या शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलिसांनी जिल्ह्याची नाकाबंदी करीत वाहने तपासण्याची मोहीम हाती घेतली. शेजारच्या जिल्ह्यातील पोलीसही सतर्क झाले. दरम्यान, आर्यनचे वडील जीवन पवार मुंबईहून गावी दाखल झाले. आज ते ग्रामस्थांसमवेत आर्यनला हाक मारीत शोधत असताना, घरापासून एक किलोमीटरवर आर्यनने वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि आर्यन जीवन पवार याच्या अचानक गायब होण्याच्या २४ तासाच्या चिंतातुर प्रकारावर पडदा पडला.