पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील पोस्टरचे लोण आता खारघरपर्यंत पोहचले आहे. खारघरमध्ये अनेक ठिकाणी बुरखाधारी महिलेचा फोटो लावला असून त्याखाली मिसिंग एवढेच इंग्रजीतून लिहिले आहेत. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले असून हे नेमके कुणी आणि का केले याचा शोध घेणे सुरु आहे. काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये “दादा मी प्रेग्नंट आहे.” अशी पोस्टर मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती. दादर आणि पुण्यातील कर्वे रोड परिसरात लावलेल्या या होर्डिंग्जची जोरदार चर्चा झाली होती. मात्र या होर्डिंगमागचा उद्देश नागरिकांना स्पष्ट झाला नसून ते कलाविश्वाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधीही “शिवडे आय अॅम सॉरी”च्या शहरभर लागलेल्या पोस्टरने खळबळ उडवून दिली होती. तर आता नवी मुंबईतील या Missing च्या पोस्टरची शहरात जोरदार सुरु आहे. नवी मुंबईच्या खारघर सेक्टर चार परिसरातील शिक्षण संस्था विविध संकुल आणि सिडको गेटवरही Missing असे लिहलेले कृष्णधवल पोस्टर लावण्यात आले आहे. यामध्ये एक बुरखाधारी महिला दाखवण्यात आली आहे. ही पोस्टरबाजी नेमकी कुणी आणि का केली याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.