राज्यातील करोना परिस्थिती व लस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणास तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच, लॉकडाउनचा कालावधी देखील वाढवला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, मुख्यमंत्री याबाबत जाहीर करणार आहेत. याचबरोबर मेडिकल ऑक्सिजन संदर्भात देखील निर्णय झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी माहिती दिली.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “मिशन ऑक्सिजनचा महत्वपूर्ण निर्णय आज झाला आहे आणि उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे त्या जिल्ह्याच्या गरजे इतका ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे करायला हवं. मग तो पीएसए प्लॅट असो किंवा एएसयू (एअर सेप्रेशन युनिट) या दोन्ही तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आपण या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना किंवा कंपन्यांना प्रोत्साहान द्यायचं. मग त्या प्रोत्साहानासाठी एक मोठी यादी आपण त्यामध्ये दिली आहे. त्यात रजिस्ट्रेशन माफी असेल, इलेक्ट्रिसिटी ड्यूटी कमी केलेली असेल, टॅरीफ कमी केलेलं आहे, स्टॅम्प ड्यूटी माफ केलेली आहे. त्यानंतर १५० किंवा १०० टक्के, मराठवाडा व विदर्भासाठी १५० टक्के व इतर भागासाठी १०० टक्के जीएसटीमध्ये माफी देण्यात आलेली आहे. अशा अनेक सवलतींची एक मोठी लिस्ट आहे. जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रात ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण व्हावं. या दृष्टीकोनातून मेडिकल ऑक्सिजनच्या उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशाप्रकारच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. आज त्याला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे.”

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय

तसेच, मंत्रिमडळातून अनेक चांगल्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांच्यासह त्याला मान्यता दिली जाईल. मात्र ऑक्सिजन संदर्भात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं, हे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने या निमित्त ठरवलं आहे. असं देखील आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी बोलून दाखवलं.

महाराष्ट्रासह सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या ५ राज्यांना सर्वात कमी ऑक्सिजन पुरवठा

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच परदेशातून भारतात ऑक्सिजन टॅंकर आणण्यात आले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णसंख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देखील राज्यं ऑक्सिजनसाठी केंद्राकडे वारंवार मागणी करताना दिसत आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि ५४ टक्के रुग्णसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये केवळ केंद्राने ४२ टक्के लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे.