सोलापूर जिल्ह्यात एकीकडे पुरेशा पावसाअभावी कोसळलेले दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे याच जिल्ह्यात उजनी धरणातील तब्बल ११७ टीएमसी एवढ्या प्रचंड पाण्याची उसाच्या पिकासाठी नासाडी केली जात असल्याबद्दल किसान संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी अस्वस्थता दर्शविली.

मराठवाडा भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सोमवारी सायंकाळी प्रा. योगेंद्र यादव यांनी सोलापूर जिल्ह्यातील अंकोली (ता. मोहोळ) व रात्री पोथरे (ता. करमाळा) या गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता रब्बी हंगामाचाही भरवसा नसल्याचे नमूद करताना दुष्काळ प्रश्नावर शासन संवेदनशील नसल्याची तक्रार उपस्थित केली.
या जिल्ह्यात दोन कोटी टनापर्यंत उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा पाण्याअभावी यापकी ८० टक्के ऊस जळून जाण्याची आणि ग्रामीण अर्थ व्यवस्था धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली.