बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. बसंत कुमार गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणात त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्री रितुपर्णा सेन गुप्ताने ट्विट करुन ही माहिती दिली. मिथुन चक्रवर्ती सध्या बंगळुरुमध्ये अडकले असून ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करत आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे बंगळुरु येथे गेलेले मिथुन तेथेच अडकले आहेत. तर त्यांच्या वडिलांचं मुंबईत निधन झालं आहे. याचकारणास्तव वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी मुंबईत परतण्यासाठी मिथुन चक्रवर्ती प्रयत्न करत आहेत. सध्या मुंबईमध्ये मिथुन यांची आई सांतिरानी चक्रवर्ती असून मिथुन यांचा मुलगा मिमोह त्यांना धीर देत आहे.

दरम्यान, बसंत कुमार हे कलकत्ता टेलीफेन्समध्ये काम करत होते. त्यांच्या पश्चात मिथुन यांच्यासह त्यांच्या तीन बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे. बसंत कुमार यांच्या निधनामुळे चक्रवर्ती कुटुंबावर शोककळा पसरली असून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.