शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या केंद्र शासनाच्या बहुप्रतीक्षित निर्णयावर कृषी क्षेत्रातून क्रांतिकारी निर्णय ते शेतकऱ्यांना धोका, फसवणूक, संकटमय अशा भिन्न स्वरूपाच्या टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या निर्णयावर भाजपच्या किसान आघाडीकडून केंद्र शासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले यांनी शासन आणि मोदींच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे.

शेतमालाच्या हमीभावात उत्पादन खर्चाच्या दीडपटीने वाढ करण्याचे सूतोवाच गत आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी केले होते. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने खरिपातील प्रमूख पिकांच्या हमीभावात वाढ करण्यास मंजुरी दिली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरीव वाढ केली आहे. मुख्यतः खरिपातील प्रमूख पीक असलेल्या भाताच्या हमीभावात प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी तर कापूस, कडधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका या पिकांच्या हमीभावातही भरीव वाढ केली आहे.

सत्ताधाऱ्यांकडून स्वागत

केंद्र शासनाच्या या निर्णयाचे भाजपाने जोरदार स्वागत केले आहे. भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण करणारा निर्णय घेवून मोदी यांनी खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना आता उत्पादित मालाच्या दराची काळजी करण्याचे कारण नसल्याने शेतकरी याचे जंगी स्वागत करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विरोधकांची आगपाखड

याउलट, शेतकरी नेत्यांनी सरकार व मोदींच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शासनाने दीडपट हमी भाव देण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात धोका दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. शासनाने घोषित केलेला हमीभाव हा फक्त २२ टक्के वाढ करणारा आहे. पण वर्षभरात खत, बियाणे, इंधन आदींची वाढ २५ टक्के झाली आहे. त्यामुळे दीडपट हमीभाव केवळ कागदावर उरला असून पुन्हा एकदा मोदींनी शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दीडपट हमीभावाच्या नावाखाली मोदींनी शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक केल्याची टीका केली. राज्य सरकारने केलेल्या हमी भावाच्या शिफारशीला केंद्र सरकारने वाटेला लावले आहे. उत्पादन खर्चाइतकीही रक्कम शासनाने दिलेली नाही. हमीभावाचे नाटक करण्यापेक्षा शेतमाल निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ज्या स्वामिनाथन समितीच्या शिफारशीला अनुसरून केंद्राने आज हमीभावात दीडपट वाढ केली, त्या शिफारशींनाच विरोध असणाऱ्या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले यांनीही केंद्राचा हा निर्णय शेतकऱ्यांना धोकादायक आणि संकटमय असल्याचे सांगितले. मोदी आणि काँग्रेसचा शेतकऱ्याकडे पाहणारा चेहरा एकच असल्याचे आता उघड झाले आहे. हमीभाव देण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान मिळण्यातील अडचणी दूर केल्या तर शेतकरी देशाला परकीय चलन मिळवून देण्याइतपत सक्षम होईल, असा दावा त्यांनी केला.