मराठवाडय़ातील वार्ताहरांकडून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद- इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात जीव ओतण्यासाठी अगदी गाणीही रचली. ‘सोनू, तुला मोदी सरकारवर भरवसा नाय काय’ असे म्हणत भाजप सरकार कशी फसवणूक करत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळच्या सत्रात काही पेट्रोल पंप वगळता बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. दुकाने, शाळा, महाविद्यालये सुरू होती. सरकारी कार्यालयात नेहमीसारखी उपस्थिती होती. रस्त्यावरील वाहतुकीवरही फारसा परिणाम दिसून आला नाही. क्रांती चौकासह विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अगदी म्हशीसमोर पिपाणीही वाजवण्यात आली. सरकारसमोर कितीही आरडाओरड केला, तरी काहीच परिणाम होत नाही, असा संदेश देत निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांसह नेतेही आंदोलनात सहभागी झाले. रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना बंद यशस्वी करता आला नाही.

लातूरमध्ये कडकडीत बंद

लातूर- पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात सोमवारी भारत बंदच्या दिलेल्या हाकेला जिल्ह्यत सर्वदूर चांगला प्रतिसाद मिळाला.

बंदचा अनुभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाठीशी नसला, तरी आजच्या बंदची जोरदार तयारी करण्यात आली होती. प्रत्येक पेट्रोल पंपावर कार्यकत्रे तनात करण्यात आले होते. शहर व ग्रामीण भागातील कार्यकत्रे नेमून दिलेले काम करत असताना दिसत होते. आमदार अमित देशमुख, त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, मोईज शेख रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांच्या सोबत नेते रस्त्यावर उतरल्याने कार्यकत्रे उत्साही दिसत होते. जिल्ह्यतील दहा तालुक्यांसह प्रमुख गावांत बंद यशस्वी करण्यात आयोजकांना यश आले. शाळा, महाविद्यालयेही बंदमध्ये सहभागी होती. काँग्रेस सरकारच्या काळातील पेट्रोल, डिझेलचे दर व सध्याचे दर याचे फलक लावून, ‘हेच का अच्छे दिन’ हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

हिंगोलीत बंदला संमिश्र प्रतिसाद

हिंगोली- आघाडीसह समविचारी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बाजारपेठ सुरू झाली. औंढा, वसमत, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, जवळा बाजार येथे शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात निवेदन दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे इंधन दरवाढीने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना शासन कमालीचे उदासीन धोरण बाळगत असल्याने महागाईच्या निषेधार्थ आघाडीसह समविचारी पक्षाने आज बंदची हाक दिली होती. शहरात आमदार रामराव वडकुते, टारफे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, रिपाइं गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, काँग्रेस नपाचे गटनेते नेहाल भया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातगाडीवर दुचाकी ठेवून हातगाडा ओढत नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला.

जालन्यात संमिश्र प्रतिसाद

जालना- इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला जालना जिल्ह्यत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. जालना शहरासह ग्रामीण भागात देखील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला प्रतिसाद दिला. सकाळपासूनच ग्रामीण भागात या आंदोलनामुळे दुकाने बंद होती. जालना शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील व्यवहार बंद करत या आंदोलनाला प्रतिसाद दिला. जालना शहरातील मामा चौकात महागाई आणि इंधन दरवाढीचा काँग्रेसने निषेध करत धरणे आंदोलन केले तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

नांदेड जिल्ह्य़ात बंदला चांगला प्रतिसाद

नांदेड- मोदी व फडणवीस सरकारच्या राजवटीत वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून महागाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या पुढाकारातून पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला नांदेड शहर व जिल्ह्यत सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेऊन सहभाग नोंदविला. बंददरम्यान जिल्ह्यत कोठेही अनुचित घटना घडली नाही. या बंदमध्ये जिल्ह्यतील अर्धापूर, भोकर, मुदखेड, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, लोहा, कंधार, मुखेड या तालुक्यातील बाजारपेठेसह शहरातील  श्रीनगर, शिवाजीनगर, जुना मोंढा, कापड मार्केट, सराफा यासह संपूर्ण बाजारपेठ बंद होती. आमदार डी. पी. सावंत व  अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली तरोडा नाका येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेस पक्षाने ठिकठिकाणी लावलेल्या बंदसंदर्भातील फलकांनीही वातावरण निर्मिती केली.

यावेळी रॅलीमध्ये हजारो कार्यकत्रे सामील झाले होते. शहरात बंद असताना काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती, त्यांना दुकान बंद करण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकत्रे करत होते. ही रॅली शिवाजीनगर, कलामंदिर, टॉवरमाग्रे सराफा, देगलूर नाका, रेल्वे स्टेशन ते  पुन्हा तरोडा नाका येथे आल्यानंतर येथे सरकारविरोधी घोषणा देवून रॅली विसर्जति करण्यात आली.

बीड जिल्ह्यत बंदला संमिश्र प्रतिसाद

बीड- महागाईच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेससह अन्य समविचारी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडसह गेवराई, परळी, माजलगाव, अंबाजोगाईत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. बीडमध्ये रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बीड शहरातील बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती. काँग्रेससह अन्य कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाईत उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. बीडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, अशोक िहगे, फरीद देशमुख आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्ह्यत बंदला संमिश्र प्रतिसाद

परभणी- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ सकाळी दोन तास बंद होती. इतर भागातील व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते. दरम्यान जिल्ह्यत सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, पालम, पुर्णा येथेही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

राज्यात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचे भाव परभणीत आहेत. या भाववाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या भारत बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाकपसह सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, नदीम इनामदार, अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते बंदचे आवाहन करत होते.

पारनेर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

पारनेर  : काँग्रेससह मित्रपक्षांनी महागाईच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला पारनेर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार गणेश मरकड यांना निवेदन देण्यात येऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.

बंदच्या पाश्र्वभूमीवर एसटीच्या पारनेर आगाराने सकाळपासून सुटणाऱ्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट जाणवत होता. अनेक शिक्षण संस्थांनीही शाळांना सुटय़ा दिल्या होत्या. गावोगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी व रविवारी विविध व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन बंदला समर्थन देण्याची विनंती केली. बहुतांश व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दर्शवत आम्ही काँग्रेसच्या भूमिकेसोबत असल्याचे सांगितल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे तसेच सभापती राहुल झावरे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने काही वेळासाठी बंद ठेऊन संपात सहभाग नोंदवला. दिवसभर व्यवसाय बंद करावेत अशी पक्षाची मागणी नव्हती. अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांची, व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये हीच त्यामागील भूमिका असल्याचे शिरोळे व झावरे यांनी सांगितले.

नेवाशात बैलगाडी मोर्चा

श्रीरामपूर : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला नेवासे शहरात व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.  विविध पक्षांच्यावतीने मोर्चाने  बैलगाडीतून जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात  महाराष्ट्र नवनिर्माण सेवा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शिवप्रहार संघटनेसह विविध संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  मोर्चात सामील झालेल्या बैलगाडय़ा तसेच दुचाकी व मोटारी या काँग्रेसच्या झेंडय़ांनी व चिन्हांनी सजवलेल्या होत्या. तहसीलदार सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भदगले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, शहराध्यक्ष गफूर बागवान, आदी सहभागी झाले होते.

जामखेड दणाणले

कर्जत : पेट्रोल व डिझेलदरवाढ, वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाची हमीभावाने न होणारी खरेदी यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी बंदला जामखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

काँग्रेस पक्षासह देशातील २१ विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात पुकारलेल्या भारत बंद अंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, जिव्हाळा फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. भारतबंद अंदोलनास पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

जामखेड येथील सहकारी बँकेपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बंद मोटारसायकल ढकलत मोर्चा काढला. या वेळी कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला होता.

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी बंद मोटारसायकली ढकलत काढलेला पायी मोर्चा जामखेड तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. या ठिकाणी झालेल्या सभेत सर्वच अंदोलकांनी सरकारच्या  धोरणाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय वारे, सिद्धार्थ घायतडक, सुनील कोठारी, अमजद पठाण, शहाजी राळेभात, जमीर सय्यद , बाजार ससमितीचे संचालक करण ढवळे, विकास राळेभात, पवन राळेभात, भारत काकडे, प्रदीप टापरे, शरद शिंदे, अवधूत पवार, डॉ कैलास हजारे, संभाजी राळेभात, अंकुश कोल्हे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अकोल्यात चांगला प्रतिसाद

अकोले : काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला अकोले शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील दुकाने, हॉटेल, टपऱ्या आदी व्यवसाय बंद होते. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. एसटी सेवाही बंद होती. दुपारनंतर शहरातील दुकाने उघडू लागली. एसटी सेवाही हळूहळू सुरू झाली. ग्रामीण भागात बंदचा प्रभाव जाणवला नाही.

बंद काँग्रेसने पुकारला असला तरी अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षच बंदमध्ये अधिक सक्रिय होते. दुपारी या पक्षांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी  काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनसे, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकतांत्रिक जनता दल, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी  राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.  मोर्चा तहसील कार्यालयावर येताच प्रवेशद्वारावर मोर्चा अडविण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

श्रीरामपुरात प्रतिसाद

श्रीरामपूर : विरोधी पक्षांच्या शहर बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसच्या दोन गटांतील गटबाजीचे दर्शन यानिमित्ताने झाले.

इंधन दरवाढीच्या निमित्ताने शहरात बंद पाळण्यात आला. काँग्रेसचे नेते व पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखाली शहरातून फेरी काढून तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब गांगड, प्रकाश ढोकणे, अशोक बागुल, लकी सेठी, संतोष कांबळे, कैलास पटारे, कैलास बोर्डे, केतन खोरे, जयश्री शेळके मनसेचे बाबा शिंदे आदी सहभागी झाले होते.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या गटाने स्वतंत्रपणे निवेदन दिले. यावेळी मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जी.के.पाटील, ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, युवराज फंड आदी सहभागी झाले होते.

राहुरीत कडकडीत बंद

विरोधी पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारत बंदला आज राहुरी शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व शिवाजी गाडे यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. विरोधी पक्षाच्या बंदलाही काँग्रेस व राष्ट्रवादीतील गटबाजीची झळ बसली.

काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निघालेल्या मोर्चात तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे, मनसेचे ज्ञानेश्वर गाडे, दादासाहेब सोनवणे, तान्हाजी धसाळ, मच्छिंद्र सोनवणे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्याम निमसे, संचालक नंदकुमार डोळस, विजय डौले, दशरथ पोपळघट, सुरेश कर्पे आदी सहभागी झाले होते.

मोर्चाच्या वतीने तहसीलदार अनिल दौंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारत बंदच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादीतील गटबाजीचे प्रदर्शन झाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मोर्चात सहभागी झाले तरी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समर्थकांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरविली.

संगमनेर तालुक्यात कडकडीत बंद

संगमनेर : पेट्रोल व डिझेलसह भरमसाट वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, खोटी आश्?वासने देणा?ऱ्या सरकारचे अच्छे दिन कुठे हरवले? असा सवाल करताना महागाईने सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले असून, जनता सरकारला वैतागली असल्याची टीका काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारवर केली आहे.

संगमनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी मित्रपक्षांच्या वतीने महागाईच्या निषेध मोर्चात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, सभापती निशा कोकरणे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, आर. एम. कातोरे, केशवराव मुर्तडक, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब पवार, बाळासाहेब  मोरे, अशोक भुतडा, सुनंदा जोर्वेकर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी  कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ास अभिवादन करत भाजप सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा नेला.

अळसुंदेत बसची काच फुटली

कर्जत : भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांनी पेट्रोल,डिझेल,घरगुती ग्यासच्या दरवाढीच्या निषेधार्थ  भारत बदंची हाक दिली होती. त्याचे पडसाद  संवेदनशील असलेल्या कर्जत तालुक्यामध्ये उमटले. सरकारच्या विरोधात अळसुंदे या गावी एका व्यक्तीने मुक्कामी असलेल्या श्रीगोंदे आगाराची एस टी सकाळी साडेसहा वाजता कर्जतकडे निघाली असता गाडीवर दगड भिरकवला, यामध्ये चालकासमोरची काच फुटली. यानंतर दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय , भारिप यासह विविध संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप सरकराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, कॉग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर, यांचेसह अनेक जण सहभागी झाले होते.

कोपरगावी मोर्चा

कोपरगाव : पेट्रोल, डिझेल ,ोगॅसच्या  दरात भरमसाठ वाढ झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस ,कॉंग्रेस, मनसे पक्षाच्या वतीने आज दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेऊन आंबेडकर पुतळ्या पासून मोर्चा नेऊन तहसीलदर किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले व वाढत्या महागाईचा निषेध केला. मोर्चाचे रुपांतर तहसील कार्यालयाच्या आवारात सभेत होऊन त्याप्रसंगी बोलताना युवानेते आशुतोष काळे  म्हणाले ,केंद्र व राज्य शासनाने गोरगरीब जनतेला महागाईच्या दणक्याने खाईत लोटले. केंद्र व राज्य शासन हे बोलघेवडे सरकार असून ते फक्त उद्य्ोगपतींचे हित जोपासत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, तालुकाअध्यक्ष राजेंद्र जाधव ,सभापती अनुसया होन, राष्ट्रवादी कॉंगेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, उपस्थित होते. आज सोमवार आठवडे बाजार असताना दोन्ही कॉंग्रेसच्या वतीने बंद पुकारला होता. त्याला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आठवडे बाजारात गर्दी कमी होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mixed response to bharat bandh of congress against fuel price hike
First published on: 11-09-2018 at 03:02 IST