संतोष मासोळे, धुळे : निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर इतर पक्षांतील नेत्यांना सामावून घेण्याच्या भाजपच्या धोरणाला धुळे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांचे प्रवेश सुरू झाले असताना गोटे यांनी पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. धुळे भाजपमध्ये आमदार गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गटातील वाद सर्वश्रुत आहेत. गोटे यांनी वेगळी भूमिका मांडल्याने त्यात आता नवीन भर पडली. उमेदवारीसाठी १७० हून अधिक इच्छुकांनी अर्ज दिल्याचा दावा गोटे समर्थकांनी केल्याने भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून धुळे महापालिका निवडणूक सर्व पक्षांसाठी महत्त्वाची आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्यास चढाओढ लागल्याने प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य पक्षांची चिंता वाढली आहे. केंद्रासह राज्यात सत्ता काबीज करताना भाजपने निवडून येण्यास सक्षम या एकाच निकषावर उमेदवारांची निवड केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही त्यास अपवाद ठरल्या नाहीत. ऐनवेळी येणाऱ्यांना उमेदवारी बहाल होत असल्याने प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी दुखावले गेले. त्याकडे दुर्लक्ष करत भाजपने सर्वपक्षीयांना सामावत घोडदौड सुरू ठेवल्याचे जळगाव आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. त्याची पुनरावृत्ती धुळे महानगरपालिका निवडणुकीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि, इतर निवडणुका आणि धुळे शहरातील स्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. इतरत्र नाराजी वगळता भाजपला फारसे सहन करावा लागले नाही. धुळे शहरात मात्र त्यांना कडव्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे.

धुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली. त्यांनी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या विधानावर आक्षेप घेत गोटे यांनी आपण सर्वच्या सर्व ७५ जागांवर कोऱ्या पाटीचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर करत महाजन यांच्यावर शरसंधान साधले. राष्ट्रीय पक्षांना बाहेरचे लोक पक्षात घेऊन त्यांना निवडून आणण्याची वाईट सवय लागली. पण ते धुळ्यात मान्य होणार नाही. बाहेरील कोणी व्यक्ती आम्हाला येऊन शिकवेल, हा धुळेकरांचा अपमान आहे. तो कदापि सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय पक्ष चालवत असूनही एका शहरात ७५ नवीन उमेदवार मिळत नाही. रात्रंदिवस लोकांसाठी धावून जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. त्याचे निवडून येण्याची क्षमता तपासण्याची गरज नाही. त्यांची गुणवत्ता तपासणारे तुम्ही कोण, तुमची गुणवत्ता कोणी तपासली अशा प्रश्नांची सरबत्ती करत गोटे यांनी भाजपचे धोरण निष्प्रभ ठरवण्याची तयारी केली आहे.

या घटनाक्रमाने आयात उमेदवारांच्या बळावर निवडणुका लढविण्याचा भाजपच्या प्रयोगाचे धुळ्यात काय होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी महाजन यांच्या सोबतीने आपले बस्तान घट्ट करण्याची धडपड चालविली आहे. भाजपचे विद्यमान आमदार गोटे यांचे तिकीट कापून विधानसभेची उमेदवारी मिळविण्याचा भामरे यांचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. गोटे-भामरे संघर्षांला महापालिका निवडणुकीत तीव्र धार चढली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन उभयतांकडून रणनीती आखली जात आहे. यानिमित्ताने भाजपमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली. गोटे यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. १७० इच्छुकांनी गोटे यांच्याकडून उमेदवारीची मागणी केल्याने अस्वस्थता आहे. भाजपच्या अधिकृत तिकीट वाटपात त्यातील किती जणांना स्थान मिळेल, याबद्दल साशंकता आहे. विरोधकांशी लढण्याआधीच उफाळलेले पक्षांतर्गत मतभेद भाजपची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे.