आमदार बच्चू कडू हे अभिनव पद्धतीने आंदोलने करणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. अपंगांच्या प्रश्नांसाठी ते वर्षांनुवष्रे अतिशय आक्रमकपणे लढत आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये अचानकपणे घुसून गेल्या वर्षी आंदोलन केले आणि रेल्वे प्रशासनाची भंबेरी उडविली होती. मंत्रालयातही ते घुसले होते, तर सेंट जॉर्जजवळील आरोग्य विभागाच्या इमारतीच्या कंपाऊंडला रंगसफेदी केली आणि अभिनव आंदोलन केले होते. आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते काय करतील, याचा काही नेम नाही.
या हिवाळी अधिवेशनात हाताला फ्रॅक्चर झाल्याप्रमाणे त्यांनी आपला एक हात गळ्यात बांधला. अपंगांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचे त्यावर लिहिले. त्यामुळे अधिवेशनात प्रत्येकाचे त्यांच्याकडे लक्ष गेले व तो एक चच्रेचा विषय झाला. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना शिवसेनेने अर्जुन खोतकर यांनी कडू यांच्या या अभिनव निषेध आंदोलनाचा मुद्दा मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याची विनंती केली. एक हात बांधून घेतल्याच्या अवस्थेत त्यांना किती काळ ठेवणार, त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच विनंती करून नगरविकास विभागाशी संबंधित मुद्दे मान्य केले. त्याचबरोबर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यावर कडू यांनी बांधलेला हात मोकळा केला. त्यामुळे आठवडाभर केलेल्या एकहाती आंदोलनाची सोमवारी यशस्वी सांगता झाली.