News Flash

लातूरमधील काँग्रेसच्या राजकारणाचा लंबक आता बसवराज पाटील यांच्या दिशेने!

सुरुवातीला बसवराज पाटील हे मुरुम नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते

लातूरमधील काँग्रेसच्या राजकारणाचा लंबक आता बसवराज पाटील यांच्या दिशेने!
बसवराज पाटील

प्रदीप नणंदकर, लातूर

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हय़ातील राजकारणाला पुन्हा एकदा वेगळे वळण प्राप्त झाले आहे. विलासराव देशमुख गटाचा वरचष्मा कमी होऊन पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर गटाचे पारडे जड झाले आहे.

आमदार बसवराज पाटील मुरुमकर हे मूळचे उस्मानाबाद जिल्हय़ातील मुरुमचे रहिवासी. गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय. युवक काँग्रेसपासून ते आजतागायत दिलेल्या जबाबदाऱ्या अतिशय कार्यक्षमतेने पार पाडणारे अशी त्यांची ओळख. शिक्षण, सहकार व राजकारण या क्षेत्रांत त्यांनी आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला आहे.

लातूरच्या राजकारणात बसवराज पाटलांनी ‘देवघरातून काँग्रेस देवाघरी नेली’ अशी त्यांच्यावर टीका झाली होती. विलासराव देशमुखही त्या काळी बसवराज पाटलांच्या कार्यशैलीवर नाराज होते. लातूर जिल्हय़ात विलासराव देशमुख म्हणतील तसेच राजकारण काँग्रेसमध्ये होत होते. बसवराज पाटलांनी धाडस करून देशमुखांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. विलासरावांच्या पश्चात जिल्हय़ात अमित देशमुखांकडे नेतृत्व आले. जिल्हय़ाच्या राजकारणावर पुन्हा एकदा देशमुखांची पकड कायम राहील अशी अपेक्षा केली जात होती, मात्र नगर परिषदांपासून जिल्हा परिषदेपर्यंत व लातूरच्या महापालिकेपर्यंत काँग्रेसची सत्तास्थाने भाजपने बळकावल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. राज्याच्या राजकारणाचा जातीय समतोल राखण्यासाठी काँग्रेसने मराठवाडय़ातील लिंगायत समाजामध्ये वेगळा संदेश देण्यासाठी बसवराज पाटील मुरुमकरांना काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद देऊन चांगली खेळी खेळली आहे.

या भागातील िलगायत समाज मोठय़ा प्रमाणात भाजपकडे वळलेला आहे. आता पुन्हा तो काँग्रेसकडे वळवण्याचे आव्हान बसवराज पाटील यांच्यासमोर राहणार आहे. प्रदेश काँग्रेसने बसवराज पाटलांना मोठी जबाबदारी देऊन चाकूरकर गटावर विश्वास ठेवला आहे. जिल्हय़ात विलासराव देशमुख गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे आव्हानही त्यांना पेलवावे लागणार आहे. अर्थात ही फार मोठी कसरत आहे. आगामी काळात ती कशी पार पाडतात यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

सुरुवातीला बसवराज पाटील हे मुरुम नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. १९८२ साली युवक काँग्रेसच्या उमरगा तालुकाध्यक्षापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९९२ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य व त्याच वेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष झाले. १९९९ मध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले व त्याच वेळी राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले.

२००४ साली उमरगा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यामुळे ते खचून गेले नाहीत. उमरगा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर लातूर जिल्हय़ातील औसा विधानसभा मतदारसंघातून ते २००९ मध्ये निवडून आले. मराठवाडय़ातील आपला मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघात उभे राहून निवडून येणारे ते एकमेव आमदार आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा औशातून ते निवडून आले. उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्हय़ांतील राजकारणात त्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दलित व मुस्लीम समाजांत त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरातील नगर परिषदांवर त्यांचे कायम प्रभुत्व राहिले. त्यांनी उभारलेला विठ्ठल सहकारी साखर कारखानाही चांगला सुरू आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात. जिभेवर नियंत्रण ठेवून वागणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. लातूर जिल्हा परिषदेत विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाला शह देण्याचा धाडसी प्रयोग शिवाजीराव निलंगेकर गटाबरोबर युती करून बसवराज पाटलांनी केला व काँग्रेसच्याच उमेदवाराला जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत बंडखोरी करून भाजपचे सहकार्य घेऊन पराभूत केले होते.

लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. शेजारील उस्मानाबाद मतदारसंघात मित्रपक्षाचा पराभव तर झाला, पण औसा या पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला चांगली आघाडी मिळाली होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हा सांभाळण्याचे आव्हान बसवराज पाटील यांच्यासमोर असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 4:24 am

Web Title: mla baswaraj m patil elected acting president maharashtra congress
Next Stories
1 तिन्ही प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातील!
2 निर्यात ठप्प झाल्याने वस्त्रोद्योगासमोर अस्तित्वाचाच प्रश्न
3 देशभरात वर्षभरात ११९ नक्षलवादी ठार
Just Now!
X