28 February 2021

News Flash

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन

भालके यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांनी सलग तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या पार्थिवावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

भालके यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर उपचार घेतल्यावर ते पुन्हा आजारी पडले. त्यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील एका शेतकरी कुटुंबात भालके यांचा जन्म झाला. लहान वयापासूनच त्यांना कुस्तीचे वेड होते. पुढे कोल्हापूरच्या लाल मातीत पैलवानकीचे डावपेच शिकलेले भालके यांनी त्यांची राजकीय कारकीर्द विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाबरोबर सुरू केली. पुढे ते याच कारखान्याचे अध्यक्ष झाले.
त्यानंतर भालके यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात पंढरपूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली. मात्र यात भालके यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ साली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या वेळी त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१४ च्या मोदी लाटेतही काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांनी माजी आ. सुधाकर परिचारक यांचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. मंगळवेढा येथील ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली. त्यावर उपचार घेतल्यावर ते पुन्हा आजारी पडले. त्यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर, मंगळवेढा मार्गे त्यांच्या सरकोली गावी आणले. त्यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांनी पार्थिवास अग्नी दिला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. प्रणिती शिंदे, प्रशांत परिचारक, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

करोनातून गुंतागुंत

आमदार भारत भेलके हे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात करोना विषाणू संसर्गावर उपचार घेत होते. उपचारांदरम्यानच त्यांना मूत्रपिंड विकाराने ग्रासले, त्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांची मूत्रपिंडे निकामी झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यावर उपचार सुरू असतानाच भालके यांचे शनिवारी निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:12 am

Web Title: mla bharat bhalke passed away mppg 94
Next Stories
1 शहीद जवान यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार
2 आवास योजनेची कामे सुरू करा
3 देशातील पहिल्या शेतकरी संपाच्या स्मारकाची प्रतिक्षा
Just Now!
X