अखेर नारायण राणे यांचा राजकीय भूकंप झालाच नाही, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा अगोदरच केली होती. राणे यांची ही स्टंटबाजी आहे. काँग्रेसविरोधात राणेंचा राग असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी व माझ्यावर टीका कशासाठी केली असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. राणे यांनी जाहीर सभेत हात तोडून टाकण्याची कार्यकर्त्यांना चेतावणी दिली असल्याने फौजदारी स्वरूपाचा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार दीपक केसरकर यांनी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, सुरेश दळवी, शिवाजी कुबल, प्रकाश परब, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, बाबी बोर्डेकर, सोनू दळवी आदी उपस्थित होते.
राणे यांची स्टंटबाजी उभ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यांनी स्वत:ला पद मिळावे म्हणून धडपड सुरू केली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुढचे पाऊल टाकण्याची त्यांनी हिंमत दाखविली नाही तर वाटाघाटीत अधिक रस असल्याचे महाराष्ट्राने पाहिले असे आमदार दीपक केसरकर म्हणाले. मला आरोप-प्रत्यारोप आवडत नाहीत, पण आरोपच झालेले असल्याने उत्तर देणे भाग होते असे ते म्हणाले.
राणेंशी माझे वैयक्तिक संबंध वाईट नव्हते, पण विकासाच्या प्रवासात त्यांनी अडथळे आणले, विकासात दहशत निर्माण केली, तेव्हा मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. राणेंना विकासाची किंमत नाही. मला काय मिळणार एवढीच त्यांची धडपड आहे. राणेंसारखी स्टंटबाजी मी केली नाही. राष्ट्रवादी राणेंशी लढण्यास तयार नव्हता म्हणून मी राजीनामा देऊन शिवसेनेत जाण्याचे जाहीर केले असे आम. केसरकर म्हणाले.
मी पक्षात वाटाघाटी करत बसलो नाही तर तत्त्वासाठी राजीनामा देऊन बाहेर पडलो. राणेंशी व्यक्तिगत माझे शत्रुत्त्व नाही. त्यामुळे राणेंनी आणखी हसे करून घेऊ नये असे सांगताना आमदार दीपक केसरकर म्हणाले. राणेंचा सारा राग काँग्रेसबद्दल होता. मग शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी व माझ्या नावाचा वापर महाराष्ट्रासमोर कशाला करता. राज्यात आमची प्रतिमा आरोप करणाऱ्यांची आहे अशी निर्माण होऊ नये असे वाटते. आम्ही विकासाचे पाईक आहोत असे आम. केसरकर म्हणाले.
राज्यात १४ वर्षे सत्ता भोगली, काँग्रेसमध्ये ९ वर्षे सत्तेत आहात आणि आता पराभवाचे धनी व्हायचे नाही असे राणे म्हणतात हेच आश्चर्यकारक आहे, असे आम. केसरकर म्हणाले.
कोकणचा, सिंधुदुर्गचा विकास व्हावा, जनता विकासाची लाभार्थी व्हावी असे आम्हाला वाटते, पण या लढाईत विकासाचा गाभा हरवत आहे, अशी भीती आम. केसरकर यांनी व्यक्त केली. माझा यापुढचा लढा विकासाचाच असेल. आरोप-प्रत्यारोपात मला पडायचे नाही असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपरिषदेत आम्ही केलेला विकास आणि कणकवली नगरपंचायत राणेंकडे असताना त्यांनी केलेल्या विकासाची तुलना करावी, असे आवाहन आम. केसरकर यांनी देऊन किनारपट्टी भागात पाणी नेणारी २६५ कोटींची नळपाणी योजना माझ्याचमुळे साकारली असून पर्यटन जिल्हा घोषित केल्याचे राणे सांगतात, पण त्यांनी विकासाकडे पाहिलेच नाही, असे आम. केसरकर म्हणाले.
जनतेच्या विकासाच्या लढय़ात अपप्रवृत्ती नष्ट झाल्याच पाहिजेत, त्यासाठीच आम्ही विकासाची लढाई लढत राहणार आहोत. लोकसभा निवडणुकीत जनतेने पराभव केला त्यातून काही त्यांनी बोध घेतला नाही म्हणूनच न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करणार आहे. लोकांसमोर राणे नम्रपणे गेले नाहीत तर हात तोडण्याची भाषा करत आहेत. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा भा.दं.वि.कलम ५०६(२) प्रमाणे न्यायालयात रिट दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे आम. केसरकर म्हणाले.
जनतेला शांतता, विकास हवा आहे. यापुढे आम्ही दूरदृष्टी ठेवून विकास साधणार आहोत असे ते म्हणाले.