लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षांना मोठी गळती लागली आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक खड्डा पडला आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. याची घोषणाही सोपल यांनी केली आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेकडे विरोधी पक्षातील नेत्यांची आवक वाढली आहे. लोकसभेच्या तोंडावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन भाजपाने काँग्रेसला जबर धक्का दिला होता. त्यानंतर आलेल्या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपा शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीला तर पश्चिम महाराष्ट्रातच हादरे बसू लागले आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे वजनदार नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेची वाट धरली आहे. सोमवारी बार्शीत स्वतःच्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार सोपल यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सोपल यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीकडे आमदार दिलीप सोपल यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे सोपल पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. युतीच्या जागा वाटप सूत्रानुसार बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे येते. सोपल यांचे विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेतून भाजपात उडी घेतल्याने सोपल यांना मार्ग मोकळा झाला होता. यापूर्वी करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राणाजगजितसिंह पाटील आणि साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

बबनदादा शिंदेही राष्ट्रवादी सोडणार-
बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जात आहे. बबनदादा शिंदे भाजपात गेले तर राष्ट्रवादीकडून त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्या शिवाजी कांबळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.