भाजप नेत्यांबरोबर राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागरांची वाढती मत्री

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहराच्या मुख्य वळण रस्त्याला जोडणाऱ्या छोटय़ा पाच रस्त्यांचेही काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर मागील दोन वर्षांत जयदत्त क्षीरसागर यांच्या रस्त्यांच्या कामाबाबत वाढलेल्या भेटी आणि समाजमाध्यमातून प्रसारित होणारे दोघांच्या छायाचित्रांमुळे आगामी राजकीय महामार्गाची बांधणीच असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या बंडाला जिल्हा परिषद निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे बळ दिल्याने आमदार क्षीरसागर हे पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांपासून अलिप्तच राहिले आहेत.

मराठवाडय़ातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेतही सुरुवातीला उस्मानाबाद आणि समारोपाला औरंगाबाद येथे केवळ उपस्थिती लावणाऱ्या क्षीरसागरांनी बीडमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या व्यासपीठाकडे मात्र पाठ फिरवली. क्षीरसागर राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याने त्यांनी ‘एकला चलो’ ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी त्यांची राजकीय मत्री अनेक कार्यक्रमांतून उघडपणे दिसून आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व इतर विकासकामांबाबत घेतलेल्या भेटी आणि दोघांची प्रसारित होणारी छायाचित्रे राजकीय जाणकारांच्या नजरेतून सुटली नाहीत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर मागील आठवडय़ात गुरुवारी मुंबईत आमदार क्षीरसागर यांनी भेट घेऊन शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य बावळण रस्त्याला जोडणाऱ्या पाच छोटय़ा रस्त्यांचीही कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी केली. दोघांची हास्यविनोद करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमातून वेगाने प्रसारित झाली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्षीरसागरांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार घेतला होता. तेव्हापासून क्षीरसागरांची भाजप नेत्यांबरोबर वाढलेली मत्री आगामी राजकीय महामार्गाची बांधणी असल्याचे कयास लावले जात आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर केवळ विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी गडकरी यांच्याबरोबर मागील दोन वर्षांत विकासकामांसाठी वाढलेल्या भेटी मात्र आगामी काळातील राजकीय परिवर्तनाचीच नांदी ठरते की काय, असेही अंदाज लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांबरोबर असलेले क्षीरसागर पुतण्याच्या बंडाला वरिष्ठ नेत्यांनी खतपाणी घातल्याने अस्वस्थ असल्यामुळे आगामी काळात ते काय निर्णय घेतात याकडे सर्वाच्या नजरा आहेत.

अखिल भारतीय साहू महासभेचे अध्यक्ष असलेले जयदत्त क्षीरसागर यांचा विदर्भात तलिक समाज मोठय़ा प्रमाणात असल्याने नितीन गडकरींबरोबर त्यांची वाढलेली मत्री राजकीय पातळीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे.