महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान शिवसेना, युवा सेना बिरवाडी विभाग पुरस्कृत शिवराय प्रतिष्ठान झंकार क्रीडा मंडळ आयोजित आमदार चषक २०१६ कबड्डी स्पर्धा मुंबई शहर संघाने जिंकली. तर रायगड जिल्हा महिला कबड्डी आमदार चषक पंचक्रोशी गडब संघाने पटकाविला.

एमएमए स्पोर्ट्स ग्राऊंड अ‍ॅडिशनल एमआयडीसी महाड बिरवाडी येथे झालेल्या तीन दिवसीय स्पध्रेत मुंबई शहर संघाने सांगली संघाला मोठय़ा फरकाने पराभूत करून आमदार चषक जिंकला आहे. तर जिल्ह्य़ाचा महिला आमदार चषक पेण तालुक्यातील पंचक्रोशी गडब संघाने अलिबाग तालुक्यातील दिलखूश आवास संघावर ३० विरुद्ध २७ असा विजय प्राप्त केला आहे.

अलिबाग तालुक्यातील मांडवा संघाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. खालापूर संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुष गट राज्यस्तरीय स्पध्रेत पहिला उपांत्य फेरीचा सामना सांगली विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात झाला. यामध्ये सांगली संघाने १७ गुण प्राप्त करीत ११ गुणांनी मुंबई उपनगर संघाला पराभूत केले. तर मुंबई उपनगर संघाला केवळ ६ गुणांवर समाधान मानावे लागले. मात्र दुसरा उपांत्य फेरीचा सामना मुंबई शहर विरुद्ध रायगड यांच्यामध्ये समान गुण मिळाल्याने बरोबरीत सुटला. त्या वेळी ५ गुण मुंबई शहर, ५ गुण रायगड अशी स्थिती होती. कबड्डीच्या नियमानुसार मुंबई शहर व रायगड यांना प्रत्येकी ५ चढाई करण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये मुंबई शहर ६ गुण व रायगड ५ गुण अत्यंत रोमांचक अशा सामन्यामध्ये मुंबई शहर १ गुणांनी विजय मिळवून आमदार चषक कबड्डी स्पध्रेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात मध्यंतरातच मुंबई शहर संघाने ३३ गुण तर सांगली संघाने १२ गुण मिळविल्याने हा सामना मुंबई शहर संघाने मोठय़ा फरकाने जिंकून आमदार चषकावर आपले नाव कोरले. तर तृतीय क्रमांकावर रायगड संघ, चतुर्थ क्रमांक मुंबई उपनगर ठरला. उत्कृष्ट चढाईपटू सांगली संघाचा सागर वराड तर उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मुंबई शहराचा मयूर शिवथरकर याला प्रदान करण्यात आला. मयूर शिवथरकर हा महाडमधील शिवाजी वाळण येथील मूळचा रहिवासी असल्याने हा बहुमान महाडला मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह होता. उत्कृष्ट पकड रायगड संघाचा खेळाडू सुजित पाटील याला देण्यात आला.  जिल्हास्तरीय महिला आमदार चषक कबड्डीमध्ये उत्कृष्ट पकडचा किताब निमिषा म्हात्रे, कालकाई मांडवा संघ अलिबाग हिला देण्यात आला. तर उत्कृष्ट चढाईपटूचा किताब दिलखूश आवास संघाची खेळाडू अनिता भोईर हिने पटकाविला. तसेच महिलांमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा किताब पेण गडब संघाची मृणाली मोकल हिला प्रदान करण्यात आला. मृणाली मोकल हिने या स्पध्रेत चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.