जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले (नगर-सेवा संस्था) बिनविरोध विजयी झाले. छाननीच्या औपचारिकतेनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. या मतदारसंघात त्यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. अन्य काही जागा माघारीच्या वेळी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संचालकांच्या उर्वरित २० जागांसाठी २४३ इच्छुकांनी ३०८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दोन्ही नेते स्वत: मात्र या निवडणुकीपासून दूर राहिले आहेत. दोघेही निवडणूक रिंगणात उतरले नाही.  
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उद्या (गुरुवार) उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, दि. २४ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि. २७ ला चिन्हवाटप होणार असून, दि. ५ मेला मतदान आणि दि. ७ मेला मतमोजणी होणार आहे.
नगर तालुका सेवा संस्था मतदारसंघात एकटय़ा कर्डिले यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांना माघारीचीही वाट पाहावी लागली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच त्यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड स्पष्ट झाली. ती होताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत समर्थकांनी हा विजय साजरा केला. कर्डिले यांच्या विजयाने विखे विरोधी थोरात-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना अशा गटाचे बँकेत खाते उघडले आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुखांमध्ये बँकेचे विद्यमान संचालक जयंत ससाणे, बिपीन कोल्हे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, वंदना पवार, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींचा समावेश आहे.