बनावट कागदपत्रांच्या मदतीने संस्थेची स्थापना

भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शेतकी संस्था स्थापन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरच्या न्यायालयाने दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सनदी अधिकारी  आर ए राजीव आणि काही मृत व्यक्तींच्या नावाचाही यात समावेश आहे.

अंबरनाथ तालुक्यातील ‘सागाव परिसर विविध कार्यकारी सेवा संस्था’ ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या अधीन राहून नोंदणीकृत करण्यात आली होती. मात्र यात  नाव आल्याने शिवसेनेचे प्रभु पाटील यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून या माहिती मिळवली. यात त्यांच्या नावासह इतर काही व्यक्तींच्या नावांचा त्यात समावेश असल्याची  माहिती उघडकीस आली. विशेष बाब म्हणजे यातील काही व्यक्तींचा मृत्यूही झाला होता. तर सनदी अधिकारी आर ए राजीव यांच्या नावाचाही यात समावेश होता. यात आमदार किसन कथोरे मुख्य प्रवर्तक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील सनदी अधिकाऱ्याचे आणि इतर सदस्य शेतकरी असून त्यांचे उत्पन्न  अल्प असल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. यातील एक  कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचारी असून एक एका बँकेत कर्मचारी असल्याचेही कळते आहे.

प्रभु पाटील यांनी बदलापूरच्या कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र तिथे गुन्हा दाखल करून न घेतल्याने अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

या वेळी संस्थेचे मुख्य प्रवर्तक आमदार किसन कथोरे आणि इतर सदस्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सहकारी संस्थांना मिळणाऱ्या शासकीय निधीचाही गैरवापर केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी उल्हासनगरच्या प्रथमवर्ग न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या वेळी काही सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाचा समावेश करताना बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था स्थापन केल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच यात सहभागी असलेले आमदार किसन कथोरे,  आर ए राजीव आणि इतर सदस्यांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हे प्रकरण जुने असून याची चौकशी सहकार खात्यातर्फे करण्यात आली आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.   – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.