शिवसेनेचे खासदार तुमाने, काँग्रेसचे धानोरकर, माज मंत्री फडणवीस यांनीही जोरगेवारांची भेट घेतली

चंद्रपूर : राज्यात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या माध्यमातून सोमवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा मागितला असला तरी सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे जोरगेवार यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जोरगेवार यांची शिवसेना खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री शोभा फडणवीस, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनीही भेट घेतली आहे.

अपक्ष आमदार जोरगेवार यांचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपा, शिवसेना  व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विविध पातळय़ांवर प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नात काही प्रमाणात का होईना भाजपाला यश आले आहे. त्याला कारण जोरगेवार यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन दिवसांपासून भाजपचे राज्यातील नेते जोरगेवार यांच्या संपर्कात आहेत, तर चिमूरचे भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन चंद्रपूरला जोरगेवार यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी जोरगेवार यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. त्यानंतर जोरगेवार व भांगडिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर शहराच्या विकासासाठी पाठिंबा मागितला असल्याचे जोरगेवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांशी काही ठराविक गोष्टींसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच पाठिंब्याचा निर्णय सहकाऱ्यांसोबत चर्चा करून घेऊ, असेही जोरगेवार यांनी सांगितले.

दरम्यान, जोरगेवार यांची तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी भेट घेऊन उद्धव ठाकरे यांचा संदेश देत पाठिंबा मागितला होता, तर २५ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनीही जोरगेवार यांची भेट घेतली होती. श्रीमती फडणवीस यांनीही भाजपसोबत येण्याचे निमंत्रण जोरगेवार यांना दिले होते. मात्र जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या काकू व कृपाल तुमाने यांच्याऐवजी भांगडिया यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यामागील अर्थ शोधला जात आहे.

विशेष म्हणजे, जोरगेवार यांच्या विजयात श्रीमती फडणवीस यांचाही खारीचा वाटा आहे, तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनीही अपक्ष आमदार जोरगेवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, काँग्रेस प्रवेशानंतर जोरगेवार यांचे तिकीट कापण्यात धानोरकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान, जोरगेवार यांनी जाहीर सभांच्या भाषणांमधून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती. एकप्रकारे जोरगेवार यांनी निवडणूक प्रचारात शामकुळे यांच्याऐवजी मुनगंटीवार यांनाच लक्ष्य केले होते. आता भाजपात मुनगंटीवार यांच्या विरोधात सक्रिय असलेला श्रीमती फडणवीस, भांगडिया गट जोरगेवार यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले आहे. त्यामुळे मुनगंटीवारांच्या विरोधात जोरगेवार यांना बळ देण्याचा विरोधी गटांचा डाव तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे.