गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर कोल्हापुरात निर्माण झालेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती घेतली आहे. कायदा सर्वासाठी समान असल्याने गुन्हा दाखल झाल्यावर कायदेशीर कारवाई करणे पोलिसांना क्रमप्राप्त आहे. पोलिसांनी कायद्याप्रमाणे कारवाई केली असतानाही त्यामध्ये कोणाला कसर वाटत असेल, आपण निर्दोष आहोत असे समजत असतील तर ते न्यायालयासमोर तसे सांगू शकतात असे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन त्यांनी आपल्या विधानातून केले.    
कोल्हापुरात खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी वकिलांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. काल मुंबई येथे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी झालेल्या चर्चेतही अपेक्षित निर्णय मिळाला नाही. त्यामुळे वकिलांनी आंदोलन पुढे रेटण्याचे ठरवले आहे. या आंदोलनाला शुक्रवारी गृहमंत्री पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. वकिलांच्या धरणे आंदोलनस्थळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.    
या वेळी पत्रकारांशी बोलताना आर.आर.पाटील म्हणाले, स्थानिक परिस्थितीची माहिती स्थानिक पोलिसांना जितक्या तपशिलाने माहिती असते ती बाहेरच्या यंत्रणांना असू शकत नाही. अनेकदा गुन्हे करताना आरोपी पूर्वनियोजित पद्धतीने हालचाली करताना पुरावे राहणार नाहीत याची दक्षता घेत असतात. त्यामुळे पोलीस तपासाला वेळ लागत असतो. कोल्हापुरातील घटनेबाबत वरिष्ठ अधिकारी योग्य तपास करीत आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींनाही लवकरच पकडले जाईल.    
निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते नवी दिल्लीत निर्णय घेतात. त्यामुळे खालच्या स्तरावर काय चर्चा होते, कोणती विधाने केली जातात याला फारसा अर्थ राहात नाही, असेही ते म्हणाले. वकिलांच्या संपाचा उल्लेख करून ते म्हणाले, कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होण्याची नितांत गरज आहे. यासाठी न्यायालयानेच पुढाकार घेतला पाहिजे. खंडपीठ मागणीचे आंदोलन हे केवळ वकिलांचे राहिले नसून त्याला जनतेचाही पाठिंबा मिळाला आहे.