नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली असतानाच आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘कुछ ही देर की खामोशी है, हमारा दौर आएगा’, असे सूचक ट्विट करत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. राज्यसभेवर जाण्यास राणे नाखूश होते. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून तशी भावनाही व्यक्त केली होती. राज्य मंत्रिमंडळात येण्यास राणे इच्छुक होते. मात्र राज्यसभा वगळता इतर पर्याय शक्य नसल्याचे राणे यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता दुसरा मार्ग नसल्याने राणे राज्यसभेसाठी तयार झाल्याचे सांगितले जाते.

नारायण राणेंच्या राज्यसभेतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘कुछ ही देर की खामोशी है, फिर कानों मे शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा’ असे ट्विट त्यांनी केले आहे. हे सूचक ट्विट करत त्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

चार दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी संभाजीराजे मालिकेतील एक दृश्य ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला होता.