सेलू येथील ग्रामीण रूग्णालयातील वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ पंकज भोयर यांनी आज पाहणी केली. रूग्णांसह त्यांचे नातेवाईक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नेहमीच त्रास होत असल्याच्या सेलू ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी होत्या.यावेळी रूग्ण व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रूग्णालयातील अडचणींची माहिती आमदार डॉ.पंकज भोयर यांना दिली.शवगृहात शवपेटी नसल्याने मृतदेह उघड्यावर ठेवले जात आहेत, त्यामुळे दुर्गंधी पसरली जाते. रूग्णालयाच्या गेटपासून परिसरातील इमारतीपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येत आहे.

परंतु ते कासवगतीने होतं आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या इमारतीचे काम मागील अनेक वर्षांपासून अर्धवट असल्याने संबंधितांना इतरत्र आसरा घ्यावा लागत असल्याचे निर्दशनास आणून दिले. पिण्याच्या पाण्यासाठी आरओ मशीन, उन्हाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाई समस्या,स्वच्छता कर्मचारी नियमित येत नसल्याने रूग्णालयात अस्वच्छतेचा कळस झाला असल्याचे आमदार भोयर यांच्या निर्दशनास आणून दिले.स्वच्छता गृहाची साफसफाई व अन्य समस्यांबाबत आमदारांनी माहिती देण्यात आली.

शवविच्छेदन गृहात सफाई कर्मचारी नियमित येत नसल्याने जिल्हा रूग्णालयातून कर्मचारी पाचारण केला जातो.पण अनेकदा कर्मचारी मिळत नसल्याने मृतदेह सेवाग्राम येथे पाठविला जातो.त्यामुळे मृतकाच्या कुटूबियांना त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती दिली. या कारणावरून अनेकदा डॉक्टर व रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.आमदार भोयर यांनी रूग्णालयात तपासणी आलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना तातडीने समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, असे निर्देश दिले. हा दवाखाना की कत्तलखाना? असे उदगार आमदारांनी काढले,  याबाबत निधी व अन्य अडचणी असल्यास त्याचे टिपण देण्याची सूचना केल्याचे आ भोयर यांनी लोकसत्तास सांगितले.भेटीत वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लवी खेडीकर,पं स सभापती अशोक मूडे, नगराध्यक्ष शारदा माहुरे, घोरड सरपंच ज्योती घंघारे प्रामुख्याने सहभागी झाले होते.