भाजपा आमदार राम कदमांनी माफी मागितल्याने हा विषय संपला आहे, असे सांगत भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राम कदम हे महिलांबद्दल असे विधान करतात असा इतिहास नाही. याउलट त्यांच्या मतदारसंघातील महिला त्यांना राखी बांधतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे विधान केल्याने आमदार राम कदम अडचणीत आले आहेत. या विधानासाठी त्यांनी माफीदेखील मागितली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राम कदमांनी यापूर्वी कधीही महिलांविषयी असे वादग्रस्त विधान केले नव्हते. याऊलट ते महिलांना मदत करतात. एखाद्या माणसाचे बोलताना चुकीचे विधान निघून गेले तर त्याचा तो अर्थ होता का, याचा विचार केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. पण त्यातून एखादे वाक्य निघाले तर त्याचा आगा आणि पिछा काय आहे याचा विचार न करता माध्यमं जे दाखवतात त्याचाही विचार केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी बोलताना तर माध्यमांनी त्याला जे बोलायचे आहे तोच अर्थ पोहोचवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. राम कदमांनी माफी मागितल्याने हा विषय संपला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.राम कदमांवर काय कारवाई करायची याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.