लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोटय़वधींच्या घोटाळ्याप्रकरणात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा मोहोळ येथील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अद्यापि फरारीच आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आमदार कदम यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे घातले. परंतु ते सापडत नाहीत.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात अध्यक्ष असताना कायदा धाब्यावर बसवून कोटय़वधींचा गरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत आमदार कदम यांच्या विरोधात मुंबईत दहिसर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाला असताना त्याच दिवशी आमदार कदम हे सोलापुरात एका पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडत होते. परंतु पोलीस आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला होता. तेव्हापासून आजतागायत शोध घेऊन देखील त्यांचा शोध लागत नाही. सीआयडीच्या तपास पथकाने आमदार कदम यांच्या बहिणीसह निकटच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. तसेच आमदार कदम यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत कर्जे देऊन वितरीत केलेली महागडी चार चाकी वाहने दुसऱ्यांनाच वापरायला दिल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यासह १९ जणांची चौकशी केली आहे. याशिवाय आमदार कदम यांच्या ताब्यातील टँकर, जेसीबी, बोरवेल मशिनरी, आलिशान मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आमदार कदम हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जातात. यापूर्वी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबारोबर मतभेद झाल्यानंतर आमदार कदम यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर एका गुन्ह्यात मोहोळ पोलीस ठाण्यावर त्यांनी स्वतच्या अटकेसाठी मोर्चा काढला असता त्यास िहसक वळण लागले होते. त्यावेळी पोलिसांनी आमदार कदम यांना अटक केली होती. दहा दिवस न्यायालयीन कोठडीत राहून जामिनीवर सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विरोधात अण्णा भाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्यामुळे त्यांची अडचण वाढली आहे.