पोलीस ठाण्यावर चाल करून पोलिसांवर दगडफेक केली व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले मोहोळचे राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांचा कारागृहातील मुक्काम येत्या सोमवारपर्यंत वाढला आहे. ते आपल्या ५४  समर्थकांसह गेल्या ४ जुलपासून अटकेत आहेत.
आमदार कदम यांनी सोलापूरच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता यापूर्वी जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी म्हणणे सादर करण्यासाठी आज शुक्रवापर्यंत मुदत मागितली होती. त्यामुळे आमदार कदम व त्यांच्या ५४ समर्थकांचा कोल्हापूरच्या कारागृहातील मुक्काम वाढला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा जिल्हा सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आले. तेव्हा जिल्हा सरकारी वकील शेंडे यांनी या प्रकरणाची कागदपत्रे पोलिसांकडून उशिरा प्राप्त झाल्यामुळे सरकारतर्फे म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा मुदतवाढीची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीशांनी येत्या सोमवापर्यंत (१३ जुल ) म्हणणे मांडण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली. आमदार कदम यांच्याकडून अ‍ॅड. मििलद थोबडे हे काम पाहात आहेत.
आमदार रमेश कदम हे सतत वादाच्या भोवऱ्यात राहात आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याबरोबर त्यांचे तीव्र मतभेद आहेत. आमदार कदम हे नेहमीच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी शिवराळ भाषा वापरतात. भर बठकीत अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक अवमान करून दमबाजी करतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी मुंडे यांनी लोकप्रनिधींनी बोलावलेल्या बठकांना अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे बंधन नसल्याचा एका शासकीय परिपत्रकाच्या आधारे निर्वाळा दिला. त्यावरून जिल्हाधिकारी कदम व जिल्हाधिकारी मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडली. या पाश्र्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात वाळू उपसा प्रकरणात हा वाद पुन्हा उफाळून आला. तेव्हा आमदार कदम यांनी जिल्हाधिकारी मुंडे यांच्या विरोधात मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी मोच्रेकऱ्यांच्या सभेत आमदार कदम यांनी कोणतेही भान न बाळगता जिल्हाधिकारी मुंडे यांना जिल्ह्यात कोठेही फिरू देऊ नका, त्यांची मोटार उसाच्या दांडक्यांनी मारून फोडून टाका, त्याच पद्धतीने मुंडे यांचे स्वागत करा, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. आश्चर्य म्हणजे शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या प्रशासनाने आमदार कदम यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती.
या पाश्र्वभूमीवर आमदार कदम यांची एक कृती पुन्हा वादग्रस्त ठरली. सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर मोहोळ येथे चौपदरी रस्त्याच्या पुलाखाली मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रशासनाने त्याठिकाणी जाळी बसविली होती. परंतु ही जाळी आमदार कदम यांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने पाडून टाकली. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता त्याचा राग जिल्हाधिकारी मुंडे यांच्यावर काढत आमदार कदमा यांनी गेल्या ४ जुल रोजी मोहोळ पोलीस ठाण्यावर अटक मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड धुडघूस घालत पोलीस ठाण्यावर व पोलिसांवर दगडफेक केली. शासकीय मालमत्तेचेही नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनाही बळाचा वापर करून आमदार कदम व त्यांच्या ५४ समर्थकांना अटक करावी लागली होती.