लोकसभेत मोदीलाट दिसल्यानंतर आगामी राजकारणात आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजपशी सलगी साधत विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ फुलवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, खुद्द बोर्डीकरांनीच याचा आता इन्कार केला असून आपण काँग्रेसचे होतो, काँग्रेसचे आहोत व काँग्रेसचे राहू, असे स्पष्टीकरणही दिले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बोर्डीकरांना भाजपच्या वाटेवर आणणारा दुवा निखळल्याने त्यांना आता शेवटी ‘हाता’चाच आधार आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेने सर्वत्र करिष्मा केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही धडकी भरली. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या प्रचारात खुल्या दिलाने मदत करणाऱ्या बोर्डीकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्याशी वैर निभावले. भांबळे यांना कट्टर विरोध करतानाच जाधव यांचा मन लावून प्रचार केला. बोर्डीकरांमुळेच जिंतूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांची जाहीर सभा झाली. ही सभा महायुतीच्या विजयासाठी निर्णायक ठरली. जिंतूर मतदारसंघात मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभा निवडणुकीतही आपल्यावर प्रेम करणारा व मुंडे यांना मानणारा मतदार अशी बेरीज करीत बोर्डीकरांनी भाजपशी सलगी वाढवली होती. विशेषत: मुंडे यांच्याशी त्यांची बोलणीही झाली होती. महाराष्ट्रात आगामी सरकार महायुतीचे असेल. अशा वेळी आपण त्या मंत्रिमंडळात राहू, या आशेवर बोर्डीकरांनी येत्या विधानसभेत कमळ हाती घेण्याचे ठरवलेही होते. मात्र, मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि बोर्डीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवाच निखळला. आता हा दुवाच नसल्याने आपल्याला पुन्हा काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढायची आहे याची मनोमन खात्री बोर्डीकरांनी कार्यकर्त्यांना नुकतीच दिली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर मतदारसंघात बोर्डीकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भांबळे यांच्यात चुरशीची लढत झाली. बोर्डीकर काँग्रेसच्या चिन्हावर, तर भांबळे अपक्ष म्हणून रिंगणात होते. राज्यात सर्वत्र निवडणुकीदरम्यान आघाडीचा धर्म पाळला जात असताना जिंतूरमध्ये मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीतला बेबनाव होता. राष्ट्रवादीनेही आघाडीचा धर्म न पाळणाऱ्या सर्व उमेदवारांवर कारवाई केली. परंतु भांबळे यांचे नाव अशा उमेदवारांमध्ये नव्हते. याचाच अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळाने भांबळे यांची लढत चालली होती.
भांबळे यांनी बोर्डीकरांविरुद्ध निवडणूक लढविल्याने बोर्डीकरांनीही लोकसभा निवडणुकीत याचा वचपा काढला. भांबळेंनी पाळला  तसाच आघाडीचा धर्म आपणही पाळू, असे बोर्डीकर लोकसभा निवडणुकीदरम्यान वारंवार सांगत होते. अखेर भांबळेंना जिंतूरमध्ये मताच्या आकडेवारीत रोखण्यात बोर्डीकर यशस्वी झाले.
लोकसभेतील पराभवानंतर भांबळे पुन्हा कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत बोर्डीकर विरुद्ध भांबळे असा संघर्ष पाहायला मिळेल. गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने बोर्डीकरांना भविष्यात नवी राजकीय वाट अनुसरायची होती. तशी रचनाही पूर्ण झाली होती. मुंडे यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता. पण मुंडे यांच्या जाण्याने बोर्डीकरांचा सगळाच डाव अध्र्यावर मोडला गेला. आता पुन्हा काँग्रेसच्याच चिन्हावर ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. जिंतूर मतदारसंघात बोर्डीकरविरुद्ध भांबळे असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. भांबळे यांनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे. या निवडणुकीत ते पुन्हा अपक्ष म्हणून बोर्डीकरांच्या विरोधात निवडणूक लढवतील. आघाडीने सर्वच जागा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला, तरीही भांबळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. बोर्डीकरांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी आपला मार्ग स्पष्ट केल्याने त्यांच्या आगामी राजकीय प्रवासाबाबत संदिग्धता दूर झाली आहे.