महापौरांच्या स्वत:च्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, ज्यांना प्रभाग टँकरमुक्त करता येत नाही ते शहराचा विकास काय करणार, नागरिकांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणारच, ज्यांना सत्ता असूनही उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद करता आली नाही, त्यांना विकासाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका करत आमदार अनिल राठोड यांनी महापौर संग्राम जगताप यांना प्रत्युत्तर दिले.
काल शिवसेनेने राठोड यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी महापालिकेवर मोर्चा नेऊन माठ फोडण्याचे आंदोलन केले. त्यावर, राजकारणासाठी पाणीप्रश्नाचा वापर करत राठोड विधानसभेसाठी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप जगताप यांनी केला होता. आज राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन जगताप यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, अनिल शिंदे, अनिता राठोड, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.
फेज टूच्या खर्चात दुपटीने कशी वाढ झाली याची चौकशी करण्याची मागणी आपण विधानसभेत करणार असल्याचे सांगताना राठोड यांनी चौकशीसाठी अनेक पत्रे दिली, परंतु विरोधी आमदार असल्याने सत्ता त्यांची असल्याने दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या नागरिकांच्याच तक्रारी होत्या, मोर्चा काढून शिवसेनेने त्याला वाचा फोडली. पक्षाचा जन्मच आंदोलनासाठी झाला आहे. राठोड यांच्या नेतृत्वाखाली वीज व पाणीप्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलने केली आहेत, त्यामुळे आम्हाला नाहीतर महापौरांनाच निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत, असा आरोप कदम यांनी केला. आयुक्तांनी मोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे मान्यच केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मनपामध्ये युतीची सत्ता असताना अनेक कामे मार्गी लागली, पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले जात होते, नगरोत्थानातील कामे मंजूर होऊनही त्यांनी टेंडर का काढले नाही, ई टेंडरमुळे ठेकेदाराला लाभ देता येत नसल्यानेच हे काम त्यांनी मार्गी लावले नाही, त्या वेळी त्यांचे हात अडीच वर्षे कोणी बांधले होते, आता पाणी वितरणात ढिसाळपणा आला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.