खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राणा कुटुंबातील तब्बल बारा सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये राणा दाम्पत्याच्या दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर रवी राणा यांच्या आई-वडिलांनाही करोनाची लागण झाली आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवीन राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. आई-वडिलांना करोनाची लागण झाल्याने रवी राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले होते. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. करोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी करोनाची टेस्ट केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.


नवनीत राणा
यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

 

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.