राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. महापुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची ते पाहणी करत आहेत. अशात आजची तारीख ही महत्त्वाची आहे. कारण वर्षभरापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच १८ ऑक्टोबर २०१९ ला शरद पवारांनी भर पावसात सातारा या ठिकाणी सभा घेतली होती. पाच ते सहा मिनिटांच्या त्यांच्या भाषणाने मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सगळा नूरच पालटून टाकला होता. त्यानंतर पुढे निकाल कसे लागले? काय काय घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलंच आहे. शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी आजोबांचा म्हणजे शरद पवार यांचा तो व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे.

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात “आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नावरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा….. ”

मला आठवतंय.. साताऱ्यात निवडणूक प्रचाराची सांगता सभा होणार होती. आभाळ भरुन आलं होतं.. कोणत्याही क्षणी पाऊस होईल अशी स्थिती होती. पण कसलीही चिंता न करता लोक येतंच होते. लोकांचा उत्साह भविष्याचं चित्र स्पष्टपणे दाखवणारा होता. अशातच साहेबांची स्टेजवर एन्ट्री झाली. साहेबांचं भाषण ऐकणाचा मोह मेघराजालाही आवरला नाही. भर पावसात जलधारा अंगावर घेत ८० वर्षांचा तरुण जाणता राजा गर्जत होता. साहेबांनी चूक कबूल करत ती दुरुस्त करण्याची साद जनसमुदायाला घातली. त्यानंतर पुढे काय झालं ते आपल्याला माहित आहेच. असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.