रामराजे आणि आमचे बंधू उदयनराजे यांच्यातील वाद विषय त्यांचा त्यांनी बघावा. त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही , असे शिवेंद्रसिहराजे यांनी स्पष्ट केले आहे. सातारा येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचे कोणाबरोबर संगनमत आणि सेटिंग झालेले नाही. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या मतदार संघांमध्ये कुरघोड्या करणे थांबवावे. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही आणि करणारही नाही. आम्ही लोकसभेला उदयनराजेंचे काम प्रामाणिकपणे केले आहे ते सातारा जावळीतील मतदारांनी बघितले आहे. आणि आता ते कसे वागत आहेत याच मूल्यमापन लोकांनीच करावे. गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने त्यांनी काम करू नये.

निवडणुकी पूर्वी ते जे बोलले होते त्याच्याशी त्यांनी प्रामाणिक राहावे एव्हढेच आमचे म्हणणे आहे, हेच शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कानावर घातले आहे. मी मुख्यमंत्र्यांना मेडिकल कॉलेज सुरू करावे आणि सातारा एमआयडीसीतील उद्योग वाढी बाबत चर्चा करण्यासाठी भेटलो होतो आणि ते मुख्यमंत्री आहेत मतदार संघातील कमाबाबत त्यांना भेटलो त्यांना भेटणे मागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. असे पत्रकारपरिषदेत सातारा येथे त्यांनी संगितले .

दरम्यान, रामराजे आणि आमचे बंधू शिवेंद्रसिहराजे यांचे संगनमत झाले असून माझ्याबद्दल ते चुकीचे आरोप करत आहेत. मी पाणी प्रश्‍नाबाबत योग्य तेच आणि लोकहिताच्या दृष्टीने बोललो होतो. त्यांना पक्षातून कुठे जायचे असेल तर त्यांनी जावे, त्यासाठी मला जबाबदार धरू नये. पक्षांतरासाठी त्यांची कुठेतरी सेटिंग झाली असेल, असा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

माझे परमबंधू शिवेंद्रराजे यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना माझ्या विरोधात लढणार्‍या  नरेंद्र पाटलांना एवढी कडकडून मिठी का मारली होती त्यांना त्यांच्या मिशा आवडल्या होत्या का. आता लोकसभा निवडणूक झाली. माझा हात दगडाखालून निघाला. आता तोच दगड मी मारीन अशी भीती त्यांना वाटते आहे. पण त्यांनी मला ओळखलेले नाही. मला जर त्यांच्या विरोधात काही करायचे असते तर यापूर्वीच केले असते आणि यापुढेही करू शकतो. पण मी तसे त्यांच्या विरोधात करणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले.