जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असतानाच यावरुन आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांना चिमटा काढला आहे. गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार, असा टोला लगावत यंदाचे पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक असेल, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस, येथील जुने सव्‍‌र्हे नंबर २४, २५ आणि इतरही शासकीय जमीन आहे. ही जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले होेते. या पार्श्वभूमीवर धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे यांच्यावर टीका केली. “यंदाचे अधिवेशन ऐतिहासिक  ठरणार आहे. विधान सभेत विरोधी पक्षनेता नाही. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुन्हा दाखल होताच फरार होतील. त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसेल”, असे त्यांनी सांगितले.

प्रकरण नेमके काय?

अंबाजोगाई तालुक्यातील पूस, येथील जुने सव्‍‌र्हे नंबर २४, २५ आणि इतरही शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आलेली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही. मात्र, मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमताने स्वत: च्या नावे नोंदवून घेतली तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. ही सर्व जमीन नंतर धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी  केली आणि ती अकृषक (एन. ए.) केली. ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून  फसवणूक करून तिची परस्पर विल्हेवाट लावली आणि तशा नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये तसेच शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने या कृतीस लागू असणाऱ्या कलमान्वये  गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार राजाभाऊ फड यांनी केली होती.  मात्र, राजकीय दबावामुळे या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तक्रारदार राजाभाऊ फड  यांनी उच्च न्यायालय खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती.