खर्चाचा तपशील वेळेत न दिल्याने कारवाई

 

धुळे : महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे १६४ उमेदवारांना पुढील तीन वर्षे मनपाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ही कारवाई केली. त्यात आमदार फारुख शाह आणि स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदेंसह काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करण्याचे निर्देश निवडणूक यंत्रणेने उमेदवारांना दिले होते. निकाल लागल्यानंतर एक महिन्यापर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत १० जानेवारी २०१९ रोजी संपुष्टात आली. परंतु, अर्ज दाखल केलेल्या ७३९ पैकी १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटिसा बजावण्यात येऊन खुलासा सादर करण्यासाठी मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी १६४ जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले.