पोलीस बंदोबस्त असूनही पाकिटमारी

नगर : जिल्हा काँग्रेसने आज, मंगळवारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या निषेध मोर्चात चोरटय़ाने हातसफाई दाखवत काँग्रेस आमदाराच्या खिशावर डल्ला मारला व पैशाचे पाकीट पळवले. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही पाकीटमारी घडली. पक्षाचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे ५ हजार रुपयांच्या नोटा असलेले पाकीट चोरटय़ाने पळवले. आ. कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली नसली तरी ‘लोकसत्ता’शी बोलताना या माहितीला दुजोरा दिला. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असतानाही चोरटय़ाने डल्ला मारलाच.

राफेल विमान घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई आदी प्रश्नांवरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. विखे यांच्यासह जिल्ह्य़ातील काही प्रमुख नेते मोर्चात सहभागी होते. आमदारांपैकी कांबळे होते. मोर्चा, कार्यालयाच्या द्वारावर अडवण्यात आला, नंतरच्या सभेतील भाषणे आटोपून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दालनात जाऊन निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या द्वारालगतच वृत्तपत्र विक्रेते त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले होते. निवेदन दिल्यानंतर विखे व कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह या विक्रेत्यांची भेट घेतली व चर्चा केली.

याच दरम्यानच आ. कांबळे यांच्या खिशातील पाकीट पळवले गेले, नंतर फाटलेला खिसा पाहून त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ही बाब त्यांचा स्वीय सहायक तुपे व इतर काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. नंतर कांबळे आपल्या वाहनातून विखे यांच्या समवेत निघून गेले.

मात्र त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली नाही. याबाबत आ. कांबळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहितीला दुजोरा दिला. पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असे विचारले असता, त्यांनी रक्कम किरकोळ होती, त्यामुळे तक्रार दिली नाही, असे सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या मोर्चातील गर्दीत चोरटय़ाने काँग्रेस आमदाराचा खिसा कापल्याची कार्यकर्त्यांत चर्चा रंगली होती. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरटा हातसफाई दाखवण्यात यशस्वी झाला. काँग्रेस पक्षाच्या मोर्चा दरम्यान पाकीटमारी घडल्याने होणारी चर्चा टाळण्यासाठी आ. कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली नसावी, असा तर्क पक्षाचे कार्यकर्ते लढवत आहेत.