केंद्रीय निवडणूक आयोगानं तातडीनं विधान परिषद निवडणूक जाहीर केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून, इच्छुकांची तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे. अशात गुरूवारी भाजपानं विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या निष्ठावंतांना डावलण्यात आलं आहे. भाजपानं उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडलं आहे. ज्यांनी पंतप्रधान मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला त्यांना संधी देण्यात आली,” अशा शब्दात खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली. २१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने ४ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, या यादीत विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारल्याचं पुढे आलं आहे.

आणखी वाचा- विधानपरिषद निवडणूक : मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी

ही यादी जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं पक्षश्रेठीला कळवलं होतं. पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर त्यात नाव नसल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. “गेली ४० वर्षे भाजपासाठी निष्ठेनं काम केलं. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर बहिष्कार घालणारे गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते यांनाही पक्षानं संधी दिली. मी, पंकजा मुंडे, बावनकुळे यांना डावलण्यात आलं. पक्ष कोणत्या दिशेनं चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे,” अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.