22 November 2019

News Flash

MMRDA चे क्षेत्र विस्तारले; ठरावाला विधानसभेत मंजुरी

पेण, खोपोली आणि उरण या तिनही नगरपालिकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एमएमआरडीएचे क्षेत्र वाढवण्यात आले असून त्याला आज (गुरूवारी) विधानसभेत मंजुरी देण्यात आली. मुंबईबरोबरच पालघर, ठाणे आणि रायगडपर्यंत, तसेच पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला तानसा नदी, दक्षिणेला खालापूरपर्यंत ही हद्द वाढवण्यात आली आहे.

पेण, खोपोली आणि उरण या तिनही नगरपालिकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली आहे. पालघर तालुका सोडून इतर सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहेच. यापूर्वी समावेश करण्यात आलेल्या भागांपैकी जो उरलेला भाग आहे, तो भाग यात समावून घेण्यात येणार आहे. तसेच पालघर तालुका मात्र नव्याने समावून घेतला जाईल. या भागांमध्ये अनेक विकासकामे एमएमआरडीएला करावी लागत आहेत. त्यामुळेच हा भाग एमएमआरडीए अंतर्गत घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईची वाढत्या लोकसंख्येला चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नियोजनबद्ध विकास करण्यासाठी एमएमआरडीएची हद्द वाढविण्यास फेब्रुवारी महिन्यातच मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यामुळे वसई, अलिबाग, खालापूर आणि पेण या तालुक्यांचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका नव्याने यामध्ये समाविष्ट करण्यात येणार होता. 1967 साली मुंबई महानगर प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्र 3 हजार 965 चौरस किलोमीटर इतके होते. कालांतराने त्यामध्ये वाढ करण्यात आणि ते 4 हजार 355 चौरस किलोमीटर करण्यात आले. तसेच यामध्ये पेण आणि अलिबागचा काही भागांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर विविध विकास प्रकल्पांमुळे ही हद्द वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

एमएमआरडीए म्हणजे काय?
26 जानेवारी 1975 रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मुंबई क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएकडे असते. दरम्यान, यामध्ये 17 सदस्यांचा समावेश असून राज्याचे मुख्यमंत्री हे या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षपदी असतात.

First Published on June 20, 2019 3:39 pm

Web Title: mmrda territory increases till pen raigad khopoli palghar vidhan sabha vidhan parishad cm devendra fadanvis jud 87
Just Now!
X