कासातील शेतकऱ्यांना नोटिसा न बजावताच ‘एमएमआरडीए’कडून बेसुमार कत्तल
डहाणू : जलवाहिनी टाकण्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या वतीने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कामे सुरू करण्यात आली आहेत. ही जलवाहिनी वेती, वरोती, घोळ आणि तवा या गावांसाठी टाकली जात आहे. ही वाहिनी काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे वाहिनीच्या आड येणाऱ्या झाडांवर ‘एमएमआरडीए’ने कुऱ्हाड चालवल्याने कासा, घोळ आणि चामदरपाडा येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जलवाहिनीच्या वाटेत येणाऱ्या वृक्षांची तोड करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस वा सूचना दिली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘एमएमआरडीए’ने नेमलेल्या ठेकेदाराकडून १०० वर्षे जुने मोह, साग आणि वड या वृक्षांची कत्तल केली जात आहे.
चामदर पाडा येथील वसंत शिनवार धांगडा आणि गोविंद धांगडा यांच्या शेतातील जागेत मोठे वृक्ष तोडण्यात आल्याने नाराजी पसरली आहे. याबाबत कासा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क झाला असता त्यांची बदली झाल्याचे सांगण्यात आले. झाडे तोडण्यासासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ना हरकत दाखला दिला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी डहाणू तालुक्यातील १८ हेक्टर वनजमीन संपादित करायची आहे. यात वेती येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी वेती येथे १६.६४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. सूर्यानगर ते तवा गावांपर्यंत राज्य महामार्ग, जिल्हा परिषद मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-८ लगत दोन हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 1:33 am