प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेने आज, गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस बंदोबस्तात राबवली. तब्बल आठ तास ही मोहीम राबवली गेली. प्रामुख्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. काही ठिकाणच्या पक्क्या अतिक्रमणांवरही हातोडा चालवण्यात आला, त्यामुळे नेहमी वाहतुकीने कोंडलेले रस्ते आज मोकळे वाटत होते. सुमारे २५० हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आल्याचे व ही मोहीम उद्याही, शुक्रवारी सुरूच राहणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळी १० वाजता जुन्या बसस्थानक चौकातून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समोरहून माळीवाडा विसाल गणेश देवस्थान मार्गे पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक मार्गे पुन्हा परत व टिळक रस्ता, स्वस्तिक चौक येथे सायंकाळी सहाच्या सुमारास मोहीम थांबवण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम पुढे गेली की मागे पुन्हा लगेच पुन्हा विक्रेते रस्त्यावर येतात, असाच आतापर्यंतच्या मोहिमेचा अनुभव होता, हे लक्षात घेऊन पथकाने पुन्हा त्याच रस्त्याने मागे मोहीम नेल्याने दिवसभर रस्ते मोकळे राहिले.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहिमेला पोलीस बंदोबस्ताअभावी मुहूर्त लागत नव्हता. अखेर आज दोन अधिकारी व ३० पोलीस कर्मचारी उपलब्ध करण्यात आल्याने ती सुरू झाली. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहेरे व अजय चारठाणकर, मोहिमेच्या पथकाचे प्रमुख सुरेश इथापे आदी उपस्थित होते. काही ठिकाणी पक्की बांधकामे हटवताना विरोध झाला, आरडाओरडा करण्यात आला, मात्र त्याला पथकाने दाद दिली नाही. शहरातील बहुतेक लोकप्रतिनिधींनीही मोहिमेत अडथळा न आणल्याने ती सायंकाळपर्यंत सुरूच राहिली.
अनेक दुकानदारांनी दुकानासमोर पक्के ओटे बांधले होते. काही ठिकाणी मोठमोठय़ा शेडही उभारल्या होत्या. माळीवाडा गणेश देवस्थानलगत तर भाजी विक्रेत्यांनी पक्की अतिक्रमणे केली होती, ती सर्व हटवण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरतील अशी अनेक बंद अवस्थेतील वाहने रस्त्यात उभी होती ती हटवण्यासाठी क्रेनचा प्रथमच वापर करण्यात आला. पक्की अतिक्रमणे जेसीबीने हटवण्यात आली.
आज प्रामुख्याने माळीवाडा परिसरातील गल्लीबोळांतून मोहीम राबवली गेली. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून ती सावेडीपर्यंत चालवली जाईल, असे मनपाचे अधिकारी इथापे यांनी सांगितले.
चिनी मांजाची होळी
अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असतानाच घातक चिनी मांजा (नायलॉन) विरुद्धची मोहीमही मनपाने सुरूच ठेवली आहे. आज सावेडी भागातील विक्रेत्यांकडील चिनी मांजा जप्त करण्यात आला व नागरिकांसमोरच, प्रोफेसर कॉलनी चौकात त्याची होळीही करण्यात आली. प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी, स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव आदींनी ही मोहीम राबवली.