महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करताना भाजपाला चिमटा काढला आहे. आपण जी सदस्य नोंदणी करत आहोत ती इतर राजकीय पक्षांसारखी बोगस करायची नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून काही होणार नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का, अशा शब्दात त्यांनी भाजपाला टोला लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ व्या वर्धापनादिनानिमित्त मुंबईतील रंगशारदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसैनिक हे माझे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले. मला जे बोलायचं आहे ते मी १८ तारखेला शिवतीर्थावर बोलणार, असे त्यांनी जाहीर केले.

१८ तारखेला मी बोलणार असल्याने तुम्ही घरी पूर्वकल्पना द्या. बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरु होतात. मनसैनिकांनी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवावे. यावेळी जर सभा सुरु असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. जर इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मनसैनिकांनी सदस्य नोंदणीची माहिती देणारे फलक लोकांना दिसतील ठिकाणी लावावे, असे आदेश त्यांनी दिले. याप्रसंगी राज ठाकरेंच्या काही प्रमुख व्यंगचित्रांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. मराठी महिला जगत, महाराष्ट्रातील कर्तबगार पुरुष, मराठी कुळ आणि मूळ ही तीन पुस्तकं मनसैनिकांनी जरुर वाचावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.